हल्ल्यानंतर रोहिणी खडसे म्हणाल्या, मी घाबरणारी नाही!; हल्ला शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला!!
Dec 28, 2021, 12:42 IST
जळगाव ः राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांच्यावर काल, २७ डिसेंबरला रात्री साडेआठच्या सुमारास मानेगाववरून मुक्ताईनगरकडे येत असताना जीवघेणा हल्ला झाला. एमएच १९ सीसी-१९१९ या क्रमांकाच्या त्यांच्या कारवर ७ हल्लेखोरांनी हा हल्ला केल्याचे सांगण्यात आले. कारमध्ये रोहिणी यांच्यासह त्यांचे पीए पांडुरंग नाफडे आणि ड्रायव्हर होता. हल्ल्यात रोहिणी यांना कसलीही दुखापत झाली नाही. हल्ल्यामुळे जळगावमधील वातावरण तापले असून, सर्व पक्षीयांनी हल्ल्याचा निषेध केला आहे. हल्ल्याबद्दल रोहिणी खडसे यांनी पत्रकारांना माहिती देताना शिवसेनेकडे बोट दाखवल्याने खळबळ उडाली आहे.
रोहिणी खडसे म्हणाल्या, की तीन मोटारसायकलीवरून सात जण आले. यात तिघे शिवसेनेचे पदाधिकारी होते. एकाच्या हातात पिस्तूल, दुसऱ्याकडे तलवार तर तिसऱ्याकडे लोखंडी रॉड होता. एकाने माझ्यावर पिस्तूल रोखले व कारचा दरवाजा उघडायचा प्रयत्न केला. पण सुदैवाने दरवाजा उघडला नाही. हातातील रॉड तिसऱ्याने कारच्या काचेवर आदळला. हल्ला घाबरविण्यासाठी होता. पण मी घाबरणारी नाही. बोदवड नगरपंचायतीपासून सुरू झालेल्या या वादातून शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी हल्ला केल्याचे रोहिणी म्हणाल्या. सुनील पाटील, पंकज कोळी व छोटू भोई अशी तिघा हल्लेखोरांची नावेही रोहिणी यांनी सांगितली आहेत.