स्वप्नात चोर यायचे, मारहाण करायचे! भितीदायक स्वप्नाला वैतागलेल्या तरुणाने जे केलं ते धक्कादायक..!

 
बारामती( लाइव्ह ग्रुप नेटवर्क): चोरांच्या धाकाने २८ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. बारामती तालुक्यातील सुपे येथे ही घटना उघडकीस आलीय. विशेष म्हणजे ज्या चोरांची धास्ती घेऊन तरुणाने हा टोकाचा निर्णय घेतला ते चोर खरे खुरे नसून स्वप्नात येणारे चोर होते. अक्षय सुरेश कदम असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे.

मृतक अक्षयच्या मावसभावाने याप्रकरणी पोलिसात तक्रार दिली आहे. मागील काही दिवसांपासून अक्षयला विचित्र स्वप्न पडत होती. घरात चोर घुसले आहेत ते मला मारत आहेत अशी स्वप्न पडत असल्याचे घरच्यांना  सांगितले होते. त्यामुळे अक्षयची समजूत काढत त्याला घरात एका वेगळ्या खोलीत झोपायला सांगितले होते.

मात्र तरीही मारहाणीचे आणि चोरांचे विचार अक्षयच्या मनातून गेले नाहीत. दुसऱ्या दिवशी उशिरापर्यंत तो झोपेतून उठला नाही म्हणून खिडकीतून त्याच्या खोलीत डोकावून बघितले असता त्याने साडीच्या सहाय्याने पंख्याला गळफास घेतलेला दिसला. याबाबत पुढील तपास पोलीस करीत आहेत.