State News : मेधा पाटकरांचा हल्लाबोल... म्हणाल्या, वुहानच्या ज्या प्रयोगशाळेतून कोरोना निघाला त्याचा मालक बिल गेट्स!

 
मुंबई : चीनच्या वुहानमधील ज्या प्रयोगशाळेतून कोरोनाचा विषाणू बाहेर निघाला त्या प्रयोगशाळेचा मालक बिल गेट्स आहे, असा खळबळजनक आरोप सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी केला आहे. मुंबईत पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे विधान केले.

ऊस तोडणी कामगारांवर अन्याय होत आहे. यासंदर्भात कायद्याचे उल्लंघन होत आहे म्हणून मेधा पाटकर यांनी मंत्रालयात सहाय्यक कामगार आयुक्त प्रवीण जाधव यांची भेट घेतली. त्यांना मागण्यांचे निवेदन दिले. त्यानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या. संपूर्ण जगाच्या शेतीवर कब्जा मिळवण्याचं लक्ष बिल गेट्स फाउंडेशनचे आहे. बिल गेट्स अमेरिकेतल्या २ लाख ४० हजार एकराचे मालक असून सुद्धा त्यांची भूक मोठी आहे.

केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या कृषी आंदोलनाला दाद न दिल्याने ७१५ शेतकरी शहीद झाले. त्या केंद्र सरकारच्या कृषी मंत्र्यांनी बिल गेट्स यांना भारतात येण्याचे निमंत्रण दिले. त्यामुळे याला कार्पोरेटायजेशन जबाबदार आहे, असे मेधा पाटकर म्हणाल्या. कामगारांच्या प्रश्नावर केंद्र सरकारची भूमिका सर्वात महत्त्वाची आहे. महाराष्ट्र, पश्चिम बंगाल यासारख्या राज्यांना ८० ते ९० हजार कोटी रुपये केंद्र सरकारने देणे आहे मात्र ते देत नाही. मात्र कामगारांसाठी काही तरी करण्याची वेळ येते तेव्हा केंद्र सरकार राज्य सरकारवर जबाबदारी टाकते. त्यामुळे सध्या जे काही सुरू आहे ते संविधान विरोधी आहे. संघर्षाशिवाय याला पर्याय नाही, असे मेधा पाटकर म्हणाल्या.