प्रेमासाठी आला सातासमुद्रापार... अमेरिकेचा नवरदेव अन् अमरावतीची नवरी..! गोष्ट एका अनोख्या लग्नाची!!
Feb 13, 2022, 14:31 IST
अमरावती : फेब्रुवारी महिना सुरू झाला प्रेमीयुगुलांना चाहूल लागते ते व्हॅलेंटाईन डेची. आपल्या मनात स्थान निर्माण करणाऱ्या व्यक्तीला भेटावं, फिरायला न्यावं अन् प्रेम व्यक्त करावं... असा बेत अनेक जण आखतात. अमरावतीत त्याहीपेक्षा एक पाऊल पुढे टाकत जोडप्याने थेट लगीनगाठ बांधण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे अमेरिकेतील नवरदेवाने अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर गाठून आपलं प्रेम व्यक्त केलं आणि मुलीच्या घरच्यांना मुलीसाठी लग्नाची मागणी घातली. घरच्यांनीही ओढेवेढे न घेता मुलीच्या मर्जीत होकार भरला आणि त्यानंतर दोघांचं लग्न धूमधडाक्यात पार पडलं.
श्रद्धा म्हस्के ही तरुणी सामान्य कुटुंबातील मात्र तरीही गरीब परिस्थितीशी झगडत तिने उच्च शिक्षण घेतलं. आयुष्याची स्वप्ने रंगवत असताना अमेरिकेत राहणाऱ्या रोशन शहा व त्यांची पत्नी जय शहा यांच्या माध्यमातून अमेरिकेतील अँड्य्रू बिसन या तरुणाशी तिची ओळख झाली. फोनवर बोलताना त्यांनी एकमेकांची मने जिंकली. अँड्य्रू हा अमेरिकेतील पोलीस विभागात सायबर क्राईममध्ये कार्यरत आहे. त्याचे वडील सेवानिवृत्त पोलीस अधिकारी आहेत तर त्याची आई तेथील एका शाळेत शिक्षिका आहे. २ फेब्रुवारी रोजी अँड्य्रू आणि श्रद्धाचा विवाह अमरावती येथील सेलिब्रेशन हॉलमध्ये पार पडला. अमरावतीची लेक आता अमेरिकेत सून म्हणून नांदणार आहे. त्यामुळे या आगळ्या वेगळ्या लग्नाची अमरावती जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू आहे.