STATE NEWS पप्पा पप्पा मम्मीला मारू नका! आई वडिलांचे भांडण सोडवायला मध्ये पडलेल्या चिमुकलीवरच निर्दयी बापाने झाडली गोळी

 
पुणे (लाइव्ह ग्रुप नेटवर्क):  आई वडिलांचे भांडण सोडवायला मध्ये पडलेल्या चिमुकलीवरच निर्दयी बापाने गोळी झाडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. शुक्रवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास पुण्यातील नऱ्हे भागात ही घटना घडली. गोळी मारणारा निर्दयी बाप हा बिल्डर असून त्याच्या विरुध्द सिंहगड पोलीस ठाण्यात रात्रीच गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार पांडुरंग उभे हा बांधकाम व्यावसायिक आहे. त्याच्याकडे परवाना असलेली बंदूक आहे. दरम्यान कोरोना काळात उभे याला बांधकाम व्यवसायात अपेक्षित नफा मिळाला नाही. त्याचा व्यवसाय मंदित असल्याने तो आर्थिक अडचणीत आहे. शुक्रवारी रात्री तो दारू पिऊन घरी आला. यामुळे पती पत्नीत जोरदार कडाक्याचे भांडण झाले.

 तुमच्यामुळे मला बाहेरच्या लोकांचा मार खावा लागतो,थांब आज तुला संपवतोच असे म्हणत पांडुरंग उभे याने पत्नीवर बंदूक रोखली. यावेळी पप्पा पप्पा मम्मीला मारू नका असे म्हणत त्याची ८ वर्षांची चिमुकली राजनंदिनी रडत रडत मध्ये पडली. मात्र यावेळी दारूच्या नशेत असलेल्या पांडुरंग उभे याने राजनंदीनी वर गोळी झाडली. त्यामुळे ती लगेच रक्ताच्या थारोळ्यात पडली.  राजनंदिनी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सिंहगड पोलिसांनी पांडुरंग उभे विरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्याला अटक सुद्धा केली आहे.