STATE NEWS मोठी बातमी! टँकरला धडकल्याने लक्झरी बस पेटली; ११ प्रवाशांचा जळून कोळसा!  ३८ जण गंभीर जखमी; महाराष्ट्रभर शोककळा

 

नाशिक( लाइव्ह ग्रुप नेटवर्क): संपूर्ण  महाराष्ट्रासाठी आज, ८ ऑक्टोबरचा दिवस काळा दिवस ठरलाय.. लक्झरी बस आणि टँकरची धडक झाल्यानंतर बसने पेट घेतला. या भीषण अपघातात वृत्त लिहिस्तोवर  ११ जणांचा जळून मृत्यू झाला असून ३८ प्रवाशी गंभीररीत्या भाजले आहेत. आज पहाटे सव्वापाच वाजेच्या सुमारास नाशिकजवळ संभाजीनगर रोडवर हॉटेल मिरची  समोर ही दुर्दैवी घटना घडली. चिंतामणी ट्रॅव्हल्सची ही बस यवतमाळ वरून मुंबईकडे जात होती.
        जाहिरात

 
 दरम्यान या घटनेचे वृत्त कळताच संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मृतांच्या वारसांना ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी सुद्धा घटनास्थळी धाव घेत मदत कार्याचा आढावा घेतला आहे. अपघातात गंभीररित्या जखमी झालेल्यांवर शासकीय खर्चातून उपचार केले जाणार असल्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

टँकर नाशिकवरून पुण्याकडे जात होता. बस आणि टँकरची धडक झाल्यानंतर बस ६० फूट पुढे घसरत गेली तर टँकर ९० मीटर पुढे जाऊन रस्त्याच्या कडेला थांबला. यानंतर काही क्षणात बसने पेट घेतला. प्रवाशी झोपेत असल्याने अनेकांना नेमके काय झाले ते कळले नाही. काही प्रवाशांनी गाडीच्या काचा फोडून उद्या मारून जीव वाचवला, ज्यांना बसच्या बाहेर निघणे शक्य झाले नाही अशा ११ जणांचा बससोबत जळून कोळसा झाला. जखमी असलेल्या ३८ जणांवर सध्या  उपचार सुरू आहेत.