आता त्याचं लगीन राहील कायम सर्वांच्या लक्षात... त्यानं नववधूला जेसीबीवरून आणले घरात!
Updated: Feb 28, 2022, 14:25 IST
भंडारा : लग्न हटके व्हावे यासाठी लोक काय करतील याचा नेम नाही. एकदाच तर करायचे लग्न, त्यामुळे होऊ दे खर्च... असे म्हणत लग्न अविस्मरणीय करण्यासाठी लाखो रुपयांचा खर्च केला जातो. वरात काढताना घोडागाडी, महागड्या गाड्या तर काहींनी हटके म्हणून बैलगाडीतून वरात काढल्याचे तुम्ही ऐकले असेल. मात्र भंडारा जिल्ह्यातील एका आगळ्या वेगळ्या वरातीची सध्या जोरदार चर्चा आहे. आता तुम्ही सांगा, जेसीबीवरून वरात काढल्यावर चर्चा तर होणारच ना भाऊ..!
भंडारा जिल्ह्यातील खात या गावात ही अनोखी वरात निघाली. सचिन निरगुळकर या तरुणाचे लग्न प्रतीक्षा या मुलीशी दुपारी वेळेवर पार पडलं. लग्न लागल्यानंतर नवरीला घरी नेण्यापूर्वी गावातून वरात काढायची अशी तिथली परंपरा आहे. या वेळी नववधूने एक वेगळाच हट्ट धरला. घरी जाईन तर जेसीबीवर बसूनच. तिचा हट्ट ऐकून उपस्थितांना आश्चर्याचा धक्का बसला. नव्या नवरीचा हट्ट पूर्ण करायचा म्हणून मग नवरदेवाच्या घरच्यांनी तयारीला सुरुवात केली. गावातून जेसीबी बोलावली आणि जेसीबीवरून डीजेच्या तालावर गावातून वरात काढण्यात आली. या अनोख्या वरातीची चर्चा आता सगळीकडे सुरू आहे.