फेसबुक मेसेंजरच्या नादात गुरुजी अडकले! अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत "तिने' उकळले पैसे!
 

 
बीड : फेसबुकवर अनोळखी लोकांच्या फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारल्यावर कसे महागात पडते याचा अनुभव बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील गंगावाडी येथील जिल्हा परिषद शिक्षकाने घेतला आहे.

फेसबुक मेसेंजरवरून ज्योती नावाच्या फेसबुक खात्यावरून येणाऱ्या हाय, हॅलोला गुरुजी उत्तर देऊ लागले. बघता बघता संवाद वाढला.त्यानंतर त्या खात्यावरून गुरुजींचे बनावट अश्लील फोटो गुरुजींना पाठविण्यात आले. ते फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन गुरुजींना पैसे मागण्यात आले. बिचाऱ्या गुरुजींनी बदनामीच्या भीतीपोटी गुगल पेवरून ४ हजार रुपये पाठवलेही. मात्र यानंतर गुरुजींना सातत्याने पैशांची मागणी होऊ लागली.

पैसे मागणारी ती आहे की तो हेही गुरुजींना कळेनासे झाले. ५ फेब्रुवारी रोजी फेसबुकवर ज्योती नाव धारण करणाऱ्या त्या व्यक्तीने गुरुजींना व्हॉटस् ॲपवर गुरुजींचे बनावट अश्लील फोटो व व्हिडिओ पाठवले. हे फोटो व्हायरल व व्हिडिओ यू ट्यूबवर अपलोड करण्याची धमकी देण्यात आली व ८ हजार रुपये मागितले. पैसे उकळून आपली फसवणूक  होत असल्याचे लक्षात आल्यानंतर गुरुजींनी ७ फेब्रुवारी रोजी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारीवरून पोलिसांनी गुरुजींना व्हॉटस् ॲपवर फोटो पाठवणाऱ्या मोबाईल नंबर धारकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.