दिल्ली डायरी: भाग२
सर्वसामान्य दिल्लीकराना बंडाळी बद्धल प्रचंड उत्सुकता! खमंग चर्चा..! बुलडाणा लाइव्ह साठी संजय मोहिते थेट नवी दिल्लीवरून..!
आज सकाळी ९ च्या ठोक्याला रेल्वे स्टेशन बाहेर पडल्यावर सीएनजी टॅक्सी ड्रायव्हर ने आमच्याशी नीट भाड्याचा सौदा केल्यावर गाडी सुरू केली अन मराठी संभाषण ऐकल्यावर लगेच' सेना फूट गयी ना , सरकार गिर जायेगी, सेना कमजोर होगी अश्या कॉमेंट्स ची सरबत्ती सुरू केली. इतना बडा लफडा हुआ और सरकार या शिवसेना को कुछ पता कैसा नही चला ? असा करडा सवाल सफाईदार अकबर रोड कडे सफाईदार वळण घेताना करीत आम्हाला निरुत्तर केले. सुरज यादव असे या बिहारी बाबूचे नाव. २४ अकबर रोड ला टॅक्सी थांबवितानाही त्यांना ' अब क्या होगा? ' असा सवाल करीतच आमचा निरोप घेतला. स्नॅक्स व तंबाखू जन्य पदार्थांची किरकोळ विक्री करणाऱ्या हरीश कुमारचा गप्पा मारतानाचा रोख राजकारणावर आणि बंडाळी वरच होता. अभा काँग्रेस कमिटीच्या कार्यालयासमोर दुपारी साडेबाराच्या सुमारास पोहोचलो तर परिसर पोलिसांनी सील केलेला !
एआयसीसी मध्ये केवळ खासदार आणि आमदार यांनाच प्रवेश असल्याचे सांगण्यात आले. अगदी समोरच्या गार्डन मध्येही पोलीस बसू देईना! मग अगदी कोपऱ्यात गेल्यावर मूळच्या राजस्थान मधील सुरक्षा कर्मिने पात्र परिचय झाल्यावर , ' वो शिंदेने तो सेना को थंडा ही कर दिया यार' असे म्हणत राजकारणालाच हात घातला. मग तीनेक मिनिटे त्याचे पोलिटिकल कॉमेंट्स ऐकावेच लागले. तेवढ्यात सायबानी हाक मारल्यावरच त्याच्या तावडीतून आमची सुटका झाली. तिथून निसटल्यावर चहाचा आस्वाद घेण्यासाठी गेलो तरी उत्तरप्रदेशी राम प्रसाद बंडाळी, सेना, भाजपा असा जप करीत चहा कडू केला! सुरक्षा हटल्यावर एआयसीसी मध्ये गेलो तर तिथेही कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी उत्तर भारतीय कार्यकर्त्यांमध्ये शिंदे आणि सेना हाच विषय रंगल्याचे चित्र आढळून आले...