नाना पटोलेंविरोधात भाजप आमदाराचे सोनिया गांधींना पत्र; म्‍हणाले, त्‍यांना पदावरून काढून टाका!

 
नागपूर : महात्मा गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना पायउतार करावे, अशी मागणी भाजपचे प्रदेश सरचिटणीस आणि विधान परिषदेचे आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून नाना पटोले चर्चेत आहेत. मी मोदींना शिव्या देऊ शकतो, मोदींना मारू शकतो अशी वादग्रस्त विधाने केल्यानंतर राज्यभरात भाजपच्या कार्यकर्त्यांनी नाना पटोलेंविरोधात जोरदार निदर्शने केली होती. वेगवेगळ्या मुद्द्यांवरून पटोले यांची कोंडी करण्याचा भाजपचा प्रयत्न सध्या सुरू आहे. नाना पटोले यांच्या राजीनाम्याची मागणी करून भाजपने जणू काँग्रेसबद्दल चिंता व्यक्त केल्याचे दिसत आहे.

बावनकुळे यांनी सोनिया गांधींना लिहिलेल्या पत्रात काँग्रेस हा सर्वात जुना पक्ष आहे. तुमचे आणि आमचे वैचारिक आणि राजकीय मतभेद असले तरी पटोले यांचे वागणे बरोबर नाही. नाना पटोले यांनी महात्मा गांधींची हत्या असे म्हणण्याऐवजी वध असा शब्द वापरला आहे. महापुरुषांचा सातत्याने अवमान करत असल्याने त्यांची ही विकृती खपवून न घेता मनोरुग्णालयात पाठवावे.

नाना पटोले जाणीवपूर्वक वादग्रस्त वक्तव्य करत आहेत. त्यामुळे काँग्रेसची प्रतिमा मलिन होत आहे. एवढा जुना पक्ष अल्पावधीत संपुष्टात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. ते सामाजिक शांतता बिघडवत आहेत. काँग्रेस आणि भाजपात राजकीय मतभेद असले तरी राष्ट्रहितासाठी सर्व मतभेद विसरून एकत्र यावे असे लोकशाहीचे संस्कार आहेत. असे बावनकुळे यांनी सोनिया गांधी यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.