सामूहिक आत्महत्या प्रकरणाला वेगळे वळण! गुप्तधनाच्या लालसेपोटी एकाच कुटुंबातील ९ जणांची हत्या झाल्याचे निष्पन्न! मांत्रिकाला अटक..!

 
सांगली( लाइव्ह ग्रुप नेटवर्क): एकाच कुटुंबातील ९ जणांनी सामूहिक आत्महत्या केल्याची घटना २० जून रोजी उघडकीस आली होती. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली होती. दरम्यान पोलीस तपासात सावकारी कर्जापोटी ही आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत होते. त्यावरून पोलिसांनी तब्बल २५ जणांना चौकशीसाठी ताब्यात  घेतले होते. मात्र आता या प्रकरणात धक्कादायक खुलासा झाला असून ही आत्महत्या नसून खून असल्याचे समोर आले आहे. गुप्तधनाच्या लालसेतून वनमोरे कुटुंबियांना विष देऊन संपविण्यात आल्याचा खळबळजनक खुलासा करण्यात आला आहे.

 सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथे दोन वेगवेगळ्या घरात वनमोरे कुटुंबियातील ९ जणांचे मृतदेह आढळले होते. या प्रकारानंतर संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली होती. प्राथमिक अंदाजानुसार विष प्राशन करून ही आत्महत्या केली असावी असा अंदाज वर्तविण्यात येत होता. त्यानंतर सावकारी कर्जापोटी या कुटुंबाने आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत होते.
  
  दरम्यान पोलिसांनी चौकशीसाठी तब्बल २५ जणांना ताब्यात घेतले होते. मात्र आता ही आत्महत्या नसून खून असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. गुप्तधनाच्या लालसेपोटी दोघांनी डॉक्टर व शिक्षक असलेल्या या भावंडांच्या कुटुंबियांना जेवणातून विष दिल्याचे समोर आले आहे. एका मांत्रिकाला एका ड्रायव्हरला पोलिसांना अटक केली असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

दोघा आरोपींचे वनमोरे कुतुबियांच्या घरी येणे जाणे होते. त्यातूनच दोघांनी ही हत्या घडवून आणल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. आब्बास मोहम्मद अली बागवान(४२,रा.मुस्लिम बाशा पेठ, मुलेगाव रोड, सरवदेनगर सोलापूर) आणि धीरज चंद्रकांत सुरवशे (३०, रा. सोलापूर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.