कर्जाच्या आमिषाने सीएकडून घटस्‍फोटित युवतीचे ६ वर्षे लैंगिक शोषण!

 
सांगली ः इव्हेंट मॅनेजमेंटचा व्यवसाय करण्यासाठी कर्ज हवे असल्याने घटस्‍फोटित युवती सीएकडे आली. पण सीएने तिच्या निराधारपणाचा फायदा उचलून, कर्ज देण्याच्या आमिषाने सहा वर्षे लैंगिक शोषण केले. यादरम्‍यान तुझ्यावर प्रेम असून, लग्न करू, असे आमिषही त्‍याने दाखवले. पण कर्ज, प्रेम, लग्न केवळ आमिष असल्याचे तिच्या लक्षात आल्यानंतर तिने नाते तोडले. तेव्हा सीएने तिला त्रास देणे सुरू केले. तिच्या आधीच्या पतीलाही दोघांच्या लैंगिक संबंधाची माहिती दिली. त्रास वाढत चालल्याने अखेर महिलेने विश्रामबाग पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. सांगली शहरात ही घटना समोर आली आहे.

पीडित युवतीला दोन मुले आहेत. चंद्रकांत चौगुले असे गुन्हा दाखल झालेल्या सीएचे नाव आहे. ताे सांगली शहरातील विश्रामबाग परिसरातील सिल्व्हर ओक अपार्टमेंटमध्ये राहतो. पीडिता दोन मुलांसह आईसोबत कोल्हापूरला राहते. पती सांभाळत नसल्याने तिने २०१२ साली घटस्फोट घेतला. त्‍यानंतर तिला स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी इव्हेंट मॅनेजमेंटचा व्यवसाय करण्याचे सूचले.

यासाठी पैशांची आवश्यकता असल्याने एका परिचितामार्फत तिची ओळख सीए चौगुलेसोबत झाली. त्‍याने कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून कागदपत्रे घेऊन सांगलीला बोलावले. यानंतर वेगवेगळी कारणे देऊन तो तिला वारंवार बाेलावू लागला. एकेदिवशी त्‍याने तिला घरी बोलावले. त्‍यावेळी घरी कुणीच नव्हतं.

यावेळी त्‍याने तिला थेट प्रेम असल्याचे सांगून लग्नाची मागणी घातली आणि जबरदस्ती लैंगिक अत्याचार केला. यानंतर २०१८ पर्यंत तो वारंवार लैंगिक शोषण करत राहिला. मात्र ना कर्ज मिळाले, ना प्रेम ना लग्न झाले... त्‍यामुळे युवती सीएला भेटायला टाळू लागली. मात्र तो बदनामीच्या धमक्या देऊ लागला. त्‍याने तिच्या आधीच्या पतीलाही दोघांच्या संबंधाची माहिती दिली. सतत त्रास वाढत चालल्याने तिने त्रासून विश्रामबाग पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. गुन्हा दाखल करून पोलीस तपास करत आहेत.