जनसंपर्क अधिकाऱ्याचा २९ वर्षीय तरुणीवर बलात्‍कार!; नोकरीला लावण्याचे आमिष

 
ठाणे : महानगरपालिकेत नोकरी लावून देतो, असे आमिष दाखवत महानगरपालिकेच्या जनसंपर्क अधिकाऱ्याने २९ वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगरात समोर आला आहे. याप्रकरणी पीडित तरुणीने उल्हासनगरातील एपीएमसी  पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून, पोलिसांनी आरोपी युवराज भदाणे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. भदाणे हा उल्हासनगर महानगरपालिकेत जनसंपर्क अधिकारी म्हणून कार्यरत आहे.

पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार, भदाणे याने तिला महानगरपालिकेत नोकरीचे आमिष दाखविले. नोकरीच्या कामानिमित्त तो तिच्याशी नेहमी फोवरून बोलायचा. त्याने तिला मुंबईला नेले. नवी मुंबईतील एका लॉजवर नेऊन तिच्याकडे शारीरिक सुखाची मागणी केली व तिच्या इच्छेविरुद्ध जबरदस्ती शारीरिक संबंध ठेवले. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात ही घटना घडल्याचे पीडितेने तक्रारीत म्हटले आहे.

पीडित तरुणी उल्हासनगर शहरातील रमाबाई आंबेडकरनगरात राहणारी आहे. जनसंपर्क अधिकाऱ्याची नोकरी मिळवण्यासाठी त्याने शाळा सोडण्याच्या दाखल्यात फेरफार केल्याचा आरोपही यापूर्वी झाला होता. महापालिका आयुक्तांच्या आदेशाने सहायक आयुक्त अच्युत सासे यांनी याप्रकरणाची तक्रार दिली आहे. एकाच आठवड्यात दोन गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल झालेला भदाणे सध्या फरारी असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.