सर्वच तालुक्यांपेक्षा मोताळ्याचे निकाल जरा हटके…! तुम्हीही म्हणाल असं कधी घडतं का…?

मोताळा (शाहीद कुरेशी : बुलडाणा लाईव्ह वृत्तसेवा) : मोताळा तालुक्यात 50 ग्रामपंचायतींच्या झालेल्या निवडणुकीची 18 जानेवारीला मतमोजणी पार पडली. या निवडणुकीत मतदार राजाने अनेक प्रस्थापितांना धक्का दिला. युवा चेहर्यांना संधी दिल्याचे दिसून आले. विजयी उमेदवारांनी गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला. काही ठिकाणी प्रमुख नेत्यांचा पॅनल विजयी झाला. मात्र पॅनल प्रमुखाला पराभवाचा सामना करावा लागला. …
 

मोताळा (शाहीद कुरेशी : बुलडाणा लाईव्ह वृत्तसेवा) : मोताळा तालुक्यात 50 ग्रामपंचायतींच्या झालेल्या निवडणुकीची 18 जानेवारीला मतमोजणी पार पडली. या निवडणुकीत मतदार राजाने अनेक प्रस्थापितांना धक्का दिला. युवा चेहर्‍यांना संधी दिल्याचे दिसून आले. विजयी उमेदवारांनी गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला. काही ठिकाणी प्रमुख नेत्यांचा पॅनल विजयी झाला. मात्र पॅनल प्रमुखाला पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे गड आला पण सिंह गेला, अशी चर्चा रंगली आहे.

मोताळा : ईश्वर चिठ्ठी काढताना चिमुकला आयुष.

तालुक्यातील 52 ग्रा. पं. मधील 478 जागांपैकी दोन ग्रामपंचायतींसह 83 उमेदवारांची बिनविरोध निवड झाली असून, सहा जागा रिक्तआहेत. उर्वरित 50 ग्रा. पं. मधील 389 जागांसाठी 947 उमेदवारांनी भाग्य आजमावले. या 50 ग्रा. पं. करिता 15 जानेवारी रोजी मतदान घेण्यात आले. या निवडणुकीचा 18 जानेवारीला निकाल लागला. येथील तहसील कार्यालयात 165 कर्मचार्‍यांनी आठ टेबलांवर 21 फेर्‍यांमध्ये मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण केली. सकाळी आठ वाजता सुरू झालेली मतमोजणी दुपारी दोन वाजता आटोपली. दरम्यान, तालुक्यात अनेक ठिकाणी धक्कादायक निकाल लागले आहेत.

हे ठरलं तालुक्यांचं वेगळंपण…

  • मतदार राजाने अनेक दिग्गजांना डच्चू देऊन नवख्या चेहर्‍यांच्या बाजूने कौल दिल्याचे दिसून आले. काही उमेदवारांचा अवघ्या एका मताने पराभव झाला. सारोळापीर व आव्हा येथे एकच उमेदवार दोन- दोन ठिकाणी निवडून आले आहेत. त्यामुळे येथील प्रत्येकी एक जागा रिक्त होणार आहे.
  • तालुक्यातील तीन उमेदवार एका मताच्या फरकाने तर एक उमेदवार दोन मताच्या फरकाने विजयी झाले आहेत. यात तपोवन येथील प्रभाग एकमधील माधुरी सुनील पाटील यांना 157 मते (विजयी) तर संगीता गोविंदा काकर यांना 156 मते मिळाली. टाकळी वाघजाळ येथील प्रभाग तीनमधील नंदा मधुसूदन सपकाळ यांना 174 मते (विजयी) तर, रुपाली वासुदेव शिराळ यांना 173 मते मिळाली. पिंपळगाव देवी येथील प्रभाग एक मधील श्रद्धा शशिकांत पाटील यांना 140 मते (विजयी) तर प्रमिला पांडुरंग पाटील यांनी 139 मते घेतली. सारोळा मारोती येथील प्रभाग तीन मधील आरती सुगदेव शिपलकर यांना 315 मते (विजयी) तर, रमेश हरिभाऊ नरसते यांना 313 मते मिळाली आहेत.

तिघांना ईश्‍वर चिठ्ठीने तारले

तालुक्यातील धामणगाव देशमुख येथील प्रतिभा अनिल देवकर व सरला काशिनाथ बिचकूले यांना प्रत्येकी 262 इतकी समान मते मिळाली. यावेळी ईश्‍वर चिठ्ठीने प्रतिभा देवकर विजयी झाल्या. दाभा येथील सपना वैभव चव्हाण व सुदाम रामजी राठोड यांना प्रत्येकी 149 मते मिळाली. ईश्‍वर चिठ्ठीत सुदाम राठोड यांनी बाजी मारली आहे. धामणगाव बढे येथील वानाबाई लक्ष्मण गवई व मेहरुन्नीसा असलम खान पठाण या दोघा उमेदवारांना प्रत्येकी 409 मते मिळाली. ईश्‍वर चिठ्ठीत वानाबाई गवई विजयी ठरल्या आहेत. येथील आयुष अमोल पाटील या पाच वर्षीय चिमुकल्याच्या हाताने ईश्‍वर चिठ्ठी काढण्यात आली.

ईश्‍वर चिठ्ठीचा वडिलांना कौल, कन्या पराभूत

दाभा येथील सुदाम रामजी राठोड व त्यांची विवाहित मुलगी सपना वैभव चव्हाण या दोघा बाप-लेकीचा ग्रा.पं. निवडणुकीत सामना झाला. मतमोजणीत दोघांना समान मते मिळाली. शेवटी ईश्‍वर चिठ्ठीने वडिल सुदाम राठोड हे विजयी झाले असून, मुलगी सपना चव्हाण पराभूत झाल्या आहेत. बाप-लेकीची ही कडवी झुंज परिसरात चर्चेचा विषय ठरली आहे.

गुलालाने माखले चेहरे…

विजयी उमेदवारांसह कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला. मतमोजणीसाठी तहसीलदार एस.एम. चव्हाण, नायब तहसीलदार आशिष सानप यांच्या मार्गदर्शनात सतीश मुळे, सतीश घड्याळे, प्रशांत जवरे, निवडणूक अधिकारी, तलाठी व कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले. दरम्यान, बोराखेडीचे पोलीस निरीक्षक माधवराव गरुड, एपीआय राहुल जंजाळ, पीएसआय अशोक रोकडे यांच्यासह पोलीस कर्मचार्‍यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.