श्रीराम मंदिरासाठी नांदुऱ्यातून जमा झाला 22 लाखांचा निधी
नांदुरा (प्रविण तायडे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः 15 जानेवारीपासून नांदुरा शहरात राबविण्यात आलेल्या श्रीराम जन्मभूमी मंदिर निर्माण अभियानाची सांगता 13 मार्चला झाली. केशव स्मृती संघ कार्यालयात यासंदर्भात बैठक घेण्यात आली.
शहरातून एकूण 22 लाख 40 हजार 688 एवढा समर्पण निधी जमा झाला. हा निधी स्टेट बँकेमार्फत अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास या खात्यात जमा करण्यात आल्याची माहिती अभियानाचे कोषप्रमुख विष्णू खडसे यांनी बैठकीत दिली. गृह संपर्क अभियानाचा कार्य वृत्तांत अभियान प्रमुख विजय सारभुकन यांनी सभेला दिला. सात हजार घरापर्यंत संपर्क करण्यात येऊन समर्पण निधी जमा करण्यात आला. नगर संघचालक गणेश नथ्थानी यांनी बैठकीचा समारोप केला. अभियानानिमित्त स्थापन झालेली आयोजन समिती बरखास्त करण्यात आल्याची घोषणा त्यांनी केली. सभेला आयोजन समिती सदस्य, वस्ती प्रमुख व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.