श्रीक्षेत्र वझेगाव येथील परमहंस रामचंद्र महाराज समाधीस्थ; लाखो भाविकांवर दुःखाचा डोंगर
श्री क्षेत्र वझेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः विदर्भातील अवलिया संत म्हणून परिचित आणि पूर्ण राज्यात मोठा भक्तपरिवार असलेले श्रीक्षेत्र वझेगाव येथील परमहंस रामचंद्र महाराज यांनी आज, १७ मे रोजी पहाटे १२ वाजून १९ मिनिटांनी अखेरचा श्वास घेतला. दुपारी १२ वाजता महाराज संस्थानमध्येच समाधिस्थ झाले.
अवलिया संत असल्याने रामचंद्र महाराजांवर भक्तांची अपार श्रद्धा आहे. दर सोमवारी श्रीक्षेत्र वझेगाव नगरीत भाविकांचा मांदियाळी असायची. रामनवमी ते हनुमान जयंती दरम्यान दरवर्षी विविध धार्मिक कार्यक्रम श्रींच्या संस्थानमध्ये होत. हनुमान जयंतीला वझेगाव नगरीतून परमहंस रामचंद्र महाराजांची भव्य मिरवणूक निघते, तर यात्रा देखील भरते. यात्रेत संपूर्ण राज्यातू भाविक भक्त दर्शनासाठी येतात. गुजरात, राजस्थान येथील भाविक देखील महाराजांच्या दर्शनासाठी नियमित वारी करत. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रामचंद्र महाराज संस्थानकडून खबरदारी म्हणून मागील दोन यात्रा उत्सव रद्द करण्यात आले होते.
१७ मे रोजी रात्री १२ वाजून १९ मिनिटांनी परमहंस श्री रामचंद्र महाराज यांनी अखेरचा श्वास घेतला. १७ मे रोजी दुपारी १२ वाजता परमहंस रामचंद्र महाराज समाधीस्थ झाले आहेत. कोरोनाच्या परिस्थितीची जाणीव ठेवता भाविक भक्तांनी घरूनच दर्शन घ्यावे. कोणीही कोरोनाची परिस्थिती आटोक्यात येईपर्यंत वझेगाव संस्थानवर येऊ नये, असे आवाहन संस्थानकडून करण्यात आले आहे. 1948 साली बाबांचा जन्म झाला होता 74 व्या वर्षी शेवटचा श्वास बाबांनी घेतला. बाबांच्या लहान भावाच्या भावाच्या सांगण्याप्रमाणे बाबांनी रात्री स्वतः जगाचा निरोप घेतला.