शेगावमध्ये सदनिका वितरण झालेच नाही, केवळ सुरुवात कुठून होईल हे सांगितले!; नगरपरिषदेऐवजी शहर पोलीस ठाण्यात झाला कार्यक्रम

शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शेगाव नगर परिषदेच्या सभागृहात काल, ३० जुलैला सकाळी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत पुनर्वसनासाठी बांधलेल्या अकोट रोडवरील ३३३ सदनिकांचे ईश्वरचिठ्ठी पध्दतीने वाटप होणार होते. मात्र ऐनवेळी हा कार्यक्रम रद्द करण्यात आला. त्याऐवजी सदनिका वितरणाची सुरुवात कोठून होईल, याची सोडत काढण्यात आली. नगर परिषदेतही हा कार्यक्रम न होता सर्वांना शहर …
 

शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शेगाव नगर परिषदेच्‍या सभागृहात काल, ३० जुलैला सकाळी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत पुनर्वसनासाठी बांधलेल्या अकोट रोडवरील ३३३ सदनिकांचे ईश्वरचिठ्ठी पध्दतीने वाटप होणार होते. मात्र ऐनवेळी हा कार्यक्रम रद्द करण्यात आला. त्याऐवजी सदनिका वितरणाची सुरुवात कोठून होईल, याची सोडत काढण्यात आली. नगर परिषदेतही हा कार्यक्रम न होता सर्वांना शहर पोलीस ठाण्यात बोलाविण्यात आले होते.

३३३ सदनिकांची तीन भागांत विभागणी करण्यात आली असून, त्या तीन भागांचे नकाशेही तयार केले आहे. त्यांना ए, बी व सी असे संबोधण्यात आले. नकाशाच्या आधारे सदनिका वितरणाची सुरुवात कोठून करायची हे ठरविण्यात येणार आहे. त्‍यासाठी ईश्वर चिठ्ठी काढण्यात आली. ईश्वरचिठ्ठीत बी टाईपचा नकाशा मंजूर करण्यात आला. याचा अर्थ सदनिका वितरणाची सुरुवात बी टाईपच्या नकाशातील सदनिकांपासून केली जाईल, अशी माहिती देण्यात आली. तसेच सदनिका वितरणाचा कार्यक्रम आयुक्तांच्या आदेशानंतर घेण्यात येईल असेही यावेळी सांगण्यात आले. यावेळी सदनिका वितरण समितीचे अध्यक्ष उपविभागीय अधिकारी श्री. जाधव, तहसीलदारांच्‍या वतीने नायब तहसीलदार सागर भागवत, मुख्याधिकारी प्रशांत शेळके यांच्यासह पुनर्वसनातील लाभार्थ्यांची उपस्थिती होती.

संतप्त महिलांनी अडविले मुख्याधिकाऱ्यांचे वाहन
खळवाडी परिसराचे सर्वेक्षण पुन्हा करा आणि वंचितांना घरे द्या. नंतरच पुनर्वसन प्रक्रिया करा, अशी मागणी करित पुनर्वसन होत असलेल्या परिसरातील संतप्त महिलांनी मुख्याधिकारी प्रशांत शेळके यांचे वाहन अडविले आणि त्यांना वाहनातून उतरवून त्यांच्यावर विविध प्रश्नांची सरबत्ती केली. संतप्त महिलांचा ताफा पाहून मुख्याधिकारी वाहनातून उतरले आणि निवेदन सादर करा, असे बोलून त्यांच्या कार्यालयात गेले. तेथे भिकू सारवान, रेणुका सारवान यांच्यासह काही माहिलांनी मागण्यांचे निवेदन दिले. खळवाडी पुनर्वसित परिसरातील रामदेव बाबानगरातील रहिवाशांना नगरपालिकेत ईश्वर चिठ्ठीने ३३३ सदनिका मिळाल्या आहेत. परंतु ज्यांच्या नावे जागा नाही ते बेघर झाले असून, त्यांचे संसार उघड्यावर आले आहेत. आम्हालाही घरे द्या, अशी मागणी रामदेव बाबानगरातील नागरिकांनी मुख्याधिकाऱ्यांकडे केली आहे. आम्हाला सदनिका मिळाल्या नाहीत तर आम्ही राहत असलेल्या जागेवरून हटणार नाही. आमच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास आम्ही वेगळ्या मार्गाचा अवलंब करू, असा इशाराही देण्यात आला आहे. निवेदनावर रेणुका सारवान, काजल करोशिया, सोनी सारवान, सुनिता सारवान, प्रमोद गवई, रुपाली सारवान, छाया पिवाल, लक्ष्मी सारवान, उषा छापरवाल, दीपा सारवान, सुनिता ढंढोरे, सखू मुल्ला सारवान आदी रहिवाश्यांच्या सह्या आहेत.