शेगावच्‍या रस्‍त्यांनी घेतला मोकळा श्वास!; सकाळीच मुख्याधिकारी जेसीबी घेऊन उतरले रस्‍त्‍यावर!!

शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शेगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत शेळके यांनी आज, 25 जूनला सकाळीच अतिक्रमणधारकांना धक्का दिला. जेसीबी आणि मोठा फौजफाटा घेऊनच ते रस्त्यावर उतरले होते. रेल्वे स्थानकापासून छत्रपती शिवाजी महाराज चौक, अग्रसेन महाराज चौक, मेन रोड, आठवडे बाजार, एमएसईबी चौकपर्यंतची अतिक्रमणे हटविण्यात आली. जोडीला पोलीस बंदोबस्त असल्याने विनाअडथळा ही मोहीम …
 

शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः शेगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत शेळके यांनी आज, 25 जूनला सकाळीच अतिक्रमणधारकांना धक्‍का दिला. जेसीबी आणि मोठा फौजफाटा घेऊनच ते रस्‍त्‍यावर उतरले होते. रेल्‍वे स्‍थानकापासून छत्रपती शिवाजी महाराज चौक, अग्रसेन महाराज चौक, मेन रोड, आठवडे बाजार, एमएसईबी चौकपर्यंतची अतिक्रमणे हटविण्यात आली. जोडीला पोलीस बंदोबस्‍त असल्याने विनाअडथळा ही मोहीम यशस्वीरित्‍या पार पडली. काही अतिक्रमणधारकांनी स्वतःहून अतिक्रमण काढून घेतले.

दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आल्यामुळे रस्ते अरुंद झालेले होते. अतिक्रमणामुळे अनेक वाहनधारक, दुचाकी, रिक्षा भर रस्त्यातच उभी करत असल्यामुळे या रस्त्यावरून ये-जा करणे सुद्धा अवघड झाले होते. शहरवासीयांनी अनेक वेळा अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्याची मागणी केली होता. त्‍यावर नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत शेळके यांनी दोन दिवसांपूर्वी शेगाव शहरात भोंगा रिक्षा फिरवून अतिक्रमणधारकांना स्वतःच अतिक्रमण हटविण्याची सूचना केली होती. अतिक्रमण न हटविल्यास नगरपालिका अतिक्रमण पथक 25 जूनपासून शहरात अतिक्रमण हटाव मोहीम राबविणार, असा इशारा देण्यात आला होता. मात्र नेमेचि येतो पावसाळा… या म्हणीप्रमाणे जो गरजते है वो बरसतें नहीं… असे समजून अतिक्रमणधारकांनी दूर्लक्ष केले.

मात्र आज सकाळी सातला मुख्याधिकारी डॉ. शेळके यांनी सहकाऱ्यांसह जेसीबी, ट्रॅक्टर, कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन शेगाव रेल्वे स्थानकापासून अतिक्रमण हटाव मोहिमेला प्रारंभ केला. मोहिमेत कोणी आडकाठी आणू नये म्‍हणून शेगाव शहर पोलिसांचा सुद्धा बंदोबस्त होता. अतिक्रमण हटाव मोहीम सुरू झाल्याचे कळताच अग्रसेन चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, जुने बस स्टँड, मेन रोड, गांधी चौक भागातील अतिक्रमण धारकांनी स्वतःच अतिक्रमण हटविण्यास सुरुवात केली. मोहिमेदरम्यान पानटपऱ्या, टिनपत्रे, बांबू बल्ली आदीसह अन्य साहित्य जप्त करण्यात आले. काही अतिक्रमणांवर जेसीबी चालविण्यात आले. मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्यात आल्यामुळे अरुंद झालेले रस्ते मोकळे झाले. ही मोहीम फक्त ठरावीक काळापुरतीच न राबविता वर्षभर राबविण्यात यावी व पुन्हा रस्त्यावर आक्रमण होणार नाही याबाबत कडक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शहरवासीयांकडून होत आहे.

अतिक्रमण हटविल्यानंतर मोकळा झालेला रस्‍ता.