शेगाव रेल्वेस्थानकावरील ‘त्या’ सुविधांसाठी युवक काँग्रेस आक्रमक
शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कोरोनाच्या नावाखाली शेगाव रेल्वे स्थानकावरील ऑटो स्टॅण्ड, मुख्य प्रवेशद्वार आणि प्लॅटफॉर्मवरील प्रवासी इलेक्टिक कार सुविधा तात्कळ सुरु कराव्यात अन्यथा युवक काँग्रेसतर्फे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा स्टेशन अधीक्षकांना निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
वर्षभरापासून लॉकडाऊन आणि विविध निर्बंध असल्याने शहरातील किरकोळ व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. केंद्राकडून यासाठी ठोस उपाययोजना केल्या गेलेल्या नाहीत. अशा स्थितीत रेल्वे विभागाकडूनही प्रवासी, ऑटो चालक आणि रेल्वे स्टेशन समोरील किरकोळ व्यावसायिकांना जाणूनबुजून कोरोनाच्या नावाखाली वेठीस धरले जात असून, रेल्वे स्टेशन, तिकीट घर, आवारातील ऑटो स्टॅन्ड बंद करणे, रेल्वे स्टेशनसमोरील मुख्य प्रथम प्रवेशद्वारासमोर टिनपत्रे आडवे लावून प्रवाशांचा रास्ता अडवणे, प्लॅटफॉर्मवरील प्रवाशी वाहतूक करणारी इलेक्ट्रिक वाहन बंद करणे आदी गोष्टी करण्यात आल्या आहेत. सात दिवसात या सर्व सुविधा प्रवाशांसाठी खुल्या करण्यात याव्यात अन्यथा रेल्वेस्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर रेल मंत्र्यांना जोडे मारो व निषेध आंदोलन छेडण्यात येईल. याशिवाय मलकापूरपासून नागझरी पर्यंत कोठेही रेल रोकोचे आंदोलन करू, असा इशाराही निवेदनात दिला आहे. काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष शैलेंद्र पाटील, कैलासबाप्पू देशमुख, अल्पसंख्याक सेलचे कार्यध्यक्ष डॉ.असलम खान यांच्या नेतृत्वात युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष जुबेर सहारा, जयंतराव खेळकर, सय्यद नासीर, आबीद शाह, भिकूभाऊ सारवण, आसीफ खान, जफर मुल्लाजी, शेख सलमान, इसा खान, जहूर खान, शेख नासीर, शाहरुख शाह, आशू जमदार, शेख इरफान, अकरम खान, शेख इमरान, शेख रजाक, शेख अब्दुल्लाह, हिम्मत खान आदींची उपस्थिती होती.