विहिगाव धरणाच्‍या भिंतीवर मोठमोठी झाडे!; भिंतीला तडे जाण्याची शक्‍यता; ग्रामस्‍थ चिंतित

खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः विहिगाव (ता. खामगाव) येथील धरणाच्या भिंतीवर सध्या मोठमोठी झाडे वाढली असून, भिंतीला तडे जाऊन धरण फुटण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वेळीच ही झाडे काढून टाकावीत, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. पाटबंधारे विभागाने वेळीच ही बाब गांभीर्याने घेतली नाही आणि धरण फुटले तर धरणाखालील अनेक गावे आणि …
 

खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः विहिगाव (ता. खामगाव) येथील धरणाच्‍या भिंतीवर सध्या मोठमोठी झाडे वाढली असून, भिंतीला तडे जाऊन धरण फुटण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्‍यामुळे वेळीच ही झाडे काढून टाकावीत, अशी मागणी ग्रामस्‍थांनी केली आहे. पाटबंधारे विभागाने वेळीच ही बाब गांभीर्याने घेतली नाही आणि धरण फुटले तर धरणाखालील अनेक गावे आणि हजारो एकर शेतजमिनीचे अतोनात नुकसान होऊ शकते. “बुलडाणा लाइव्ह’ने खामगाव येथील पाटबंधारे विभागाचे शाखा अधिकारी पूनम कळसकार यांच्याशी संपर्क साधला असता, लवकरच धरणाच्या भिंतीवरील अनावश्यक झाडे काढली जातील, असे त्‍यांनी सांगितले.

भिंतीवर गेल्या काही वर्षांपासून अनेक मोठमोठी अनावश्यक बाभळीची, निंबाची व इतर झाडे वाढली आहेत. या धरणातून पाटबंधारे विभागाला दरवर्षी मोठे आर्थिक उत्पन्‍नही मिळत असते. या धरणात मच्छीमारीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो. त्यामुळे दरवर्षी हे धरण लाखो रुपयांना मच्छिमारीसाठी विकले जाते. याच धरणातील पाण्यावर सातशे ते आठशे एकर जमीन दरवर्षी तेथील आजूबाजूचे गावकरी बागायती करत असतात. पातोंडा, पेडका, विहिगाव, रामनगर, निळेगाव, हिंगणा, चितोडा, संभापूर, पळशीपर्यंतच्‍या काही गावांनी पाईपलाईनच्या साहाय्याने धरणातून जमीन बागायती करण्यासाठी पाणी नेले आहे, तर काही गावांना पाटाच्या पाण्याद्वारे या धरणातून जमिनी बागायती करण्याची संधी मिळते. मात्र याच भिंतीवर गेल्या काही वर्षांपासून मोठमोठी अनावश्यक बाभळीची, निंबाची व इतर झाडे वाढली आहेत त्यामुळे येणाऱ्या काही वर्षात धरणाच्या भिंतीला तडे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.