प्रसिद्ध भेंडवळचे भाकित : यंदा पाऊस कमीच, ‘राजा’ राहील टेन्शनमध्ये!; वाचा सविस्तर ‘भाकित..’
बुलडाणा (मनोज सांगळे, मो. 9822988820ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः यंदा पर्जन्यमान कमी होणार असून, जूनमध्ये कमी तर जुलैमध्ये सार्वत्रिक आणि चांगला पाऊस होईल. याच महिन्यात अतिवृष्टीही होऊ शकते. नंतरच्या ऑगस्ट, सप्टेंबरमध्येही कमी पाऊस होईल, असे भाकित साडेतीनशे वर्षांची परंपरा असलेल्या सुप्रसिद्ध भेंडवळच्या (ता. जळगाव जामोद) घटमांडणीतून आज, 15 मे रोजी पहाटे सहाच्या सुमारास वर्तविण्यात आले.
केवळ शेतीच नव्हे तर राजकीय, भौगोलिक, सामाजिक उलथापालथीचे अंदाज वर्तविणाऱ्या या घटमांडणीचे निष्कर्ष चंद्रभान महाराजांचे वंशज पुंजाजी महाराज आणि त्यांचे सहकारी सारंगधर महाराज यांनी सांगितले. केवळ जिल्हाच नव्हे तर राज्याचे लक्ष या घटमांडणीकडे लागलेले असते. कडक लॉकडाऊन असला तरी परंपरा खंडीत होऊ नये म्हणून केवळ चंद्रभान महाराज यांच्या वंशजांसह पाच लोकांनी अक्षय्य तृतीयेला सायंकाळी भेंडवळ येथे घट मांडणी केली होती. आज पहाटे सूर्योदयापूर्वी त्या घट मांडणीचे निरीक्षण करत त्यानुसार या वर्षीचे भाकीत वर्तविले.
घटमांडणीचे ठळक मुद्दे..
- अनेक ठिकाणी दुष्काळग्रस्त परिस्थिती.
- पीक परिस्थिती साधारण, पण रोगराईमुळे नुकसान.
- अवकाळी पावसाचे प्रमाणही कमी.
- प्रचंड चाराटंचाई निर्माण होणार असल्याने पशुधन संकटात.
देशाचा राजा कायम, मात्र प्रचंड संकटांचा सामना करावा लागणार. त्यामुळे राजा तणावात राहील. - आर्थिक परिस्थिती अतिशय ढासाळलेली राहील.
- राजकीय परिस्थितीही अस्थिर.
- घुसखोरीमुळे संरक्षण खात्यावर ताण, युद्धजन्य परिस्थितीही उद्भवणार
- नैसर्गिक संकटांमध्ये जीवित हानी मोठ्या प्रमाणात होणार
- पृथ्वीवर अनेक संकटे येणार. त्यात नैसर्गिक संकटे, रोगराई, परकीय घुसखोरी, अतिवृष्टीसारख्या आपत्तीचा समावेश.
- ज्वारी, तूर, गहू, कपाशी, सोयाबीन सर्व पिके सर्वसाधारण येतील. पिकांची नासाडी होण्याची शक्यता आहे. पहिल्याच महिन्यात पीक पेरणी केली जाईल, चारा टंचाई भासेल.