नांदुरा तालुक्‍यात पावसाने असा घातलाय धुमाकूळ… पूल गेले वाहून, गावांचा तुटलाय संपर्क, वीज पडून दोन माकडांचा मृत्‍यू; “ही’ धरणे ओव्‍हर फ्‍लो!

नांदुरा (प्रविण तायडे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः नांदुरा तालुक्यात काल संध्याकाळपासून विजेच्या कडकडाटासह धो धो पाऊस सुरू आहे. यामुळे नदी- नाले तुडुंब भरून वाहत आहेत. विश्वगंगा नदीवरील पलढग धरण १०० टक्के भरले असून, शेंबा नदीवरील कच्चा पूल वाहून गेल्याने नांदुरा- मोताळा वाहतून ठप्प झाली आहे. वडनेर भोलजीजवळ असलेल्या बुट्टी गावाला जाण्यासाठी विश्वगंगा नदी ओलांडून …
 

नांदुरा (प्रविण तायडे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः नांदुरा तालुक्यात काल संध्याकाळपासून विजेच्या कडकडाटासह धो धो पाऊस सुरू आहे. यामुळे नदी- नाले तुडुंब भरून वाहत आहेत. विश्वगंगा नदीवरील पलढग धरण १०० टक्‍के भरले असून, शेंबा नदीवरील कच्चा पूल वाहून गेल्याने नांदुरा- मोताळा वाहतून ठप्प झाली आहे. वडनेर भोलजीजवळ असलेल्या बुट्टी गावाला जाण्यासाठी विश्वगंगा नदी ओलांडून जावे लागते. याच नदीवर छोटा पूल असून, पुलावरून पाणी वाहत असून या गावाचा संपर्क पूर्णतः तुटला असून वाहतूक ठप्प झाली आहे.

सकाळपासून पाऊस सुरूच असल्याने पूर अधिक वाढू शकतो. त्यामुळे कोणीही पुलावरून जाऊ नये, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे. नांदुरा शहरातील शांतीनगरमधील साबीर पठाण यांच्या घराजवळ असलेल्या झाडावर वीज पडून झाडावर बसलेल्या दोन माकडांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, सुदैवाने मनुष्य हानी झाली नाही. तालुक्यात सोयाबीन पीक काढणीला आले आहे. सोयाबीन व कापूस पिकांची जास्त प्रमाणात नासाडी झाली असून, कपाशीच्या कैऱ्या सडत असून, शेतकरी संकटात सापडला आहे. ज्ञानगंगा धरण क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस पडत असून, गेरू माटरगाव येथील धरण १०० टक्‍के भरले आहे. या नदीकाठच्या गावांना इशारा देण्यात आला आहे. याच नदीवर वळती वसाळी येथील गोडबोले बंधारा पूर्णपणे भरला असून त्यांचे स्वयंचलित दरवाजे उघडले असल्याने नदी तुडूंब भरून वाहत आहे.