तो आहे म्हणून तुम्ही आहात, व्यापाऱ्यांनो इतके तरी लक्षात ठेवा..!; भुईमूगाचे दर पाडण्याचे ‘सत्य’ दुर्दैवी
खामगाव (मनोज सांगळे, मो. 9822988820ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा)ः खामगाव बाजार समितीत काल, 28 मे रोजी दुपारी भुईमुगाचे दर पाडण्यावरून शेतकऱ्यांचा संताप अनावर झाला. त्यानंतर झालेल्या दगडफेकीत तिघे जखमी झाले. कोणत्याही मालाची आवक वाढली की भाव पाडण्याचे प्रकार व्यापाऱ्यांकडून घडतात. हाच प्रकार इथे घडला आणि अतिच झाल्याने शेतकऱ्यांनी विरोध केला. भूईमुगाला 5 हजार 271 रुपये हमी भाव आहे. असे असताना अवघा साडेतीन हजार रुपये क्विंटल भाव देऊन व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या असहायतेचा फायदा उचलण्याचा प्रयत्न केला. बाजार समिती प्रशासनाची लेचीपेची भूमिकाही यातून दिसून आली. शेतकऱ्यांची उघड उघड लूट होत असताना ते यात हस्तक्षेप का करत नाहीत, असा प्रश्न आहे. त्यासाठी शेतकऱ्याला रौद्ररुप धारण करण्याची गरज पडली.
यंदा जिल्ह्यात आणि परिसरात उन्हाळी भूईमुगाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर झाले आहे. त्यातच खामगाव बाजार समितीत दोनच दिवस शुक्रवारी आणि शनिवारी भूईमुगाची खरेदी होते. परिणामी आवक वाढलेली असते. आवक बघता खरेदी रोज करावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. मात्र बाजार समितीने दूर्लक्ष केल्याने व्यापाऱ्यांची मनमानी सुरू झाली आणि भाव पार साडेतीन हजारांवर आणण्यात आले. त्यातही खरेदीसाठी 4-5 च व्यापारी पुढे येतात आणि तेच संगनमताने दर ठरवतात. त्यामुळे कालचा राडा झाला. खरेदी साडेतीन हजारांनी सुरू केल्यानंतर जेव्हा वाद वाढला आणि शेतकऱ्यांच्या संतापाचा उद्रेक झाला, तेव्हा याच व्यापाऱ्यांनी 4 हजार 500 रुपये दर दिला. त्यामुळे लुटीवर एकप्रकारे शिक्कामोर्तबच झाले. खामगाव बाजार समितीत शेतकऱ्यांना नेहमीच अडचणीत आणले जाते. कोणत्याच शेतमालाला चांगला भाव मिळत नाही. यासाठी बाजार समिती प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांचेही धोरण कारणीभूत आहे. त्यांच्या बोटचेप्या भूमिकेमुळे शेतकरी नाडला जातो आणि मालाचा दर्जा चांगला नाही, अशी सबब दाखवून व्यापारी शेतकऱ्यांची मुंडकी मोडतात.
तोडगा निघाला पण तो समाधानकारक नाहीच…
24 मेपासून बाजार समितीत कोरोनाविषयक नियम पाळून शेतमाल खरेदी सुरू झाली. 28 मे रोजी खरेदीचा पहिलाच दिवस असल्यामुळे तब्बल 15 ते 20 हजार पोत्यांची आवक झाली. सकाळी साडेअकरापासूनच साडेतीन हजार ते 4 हजार असा भाव देण्यात येत होता. काही शेतकऱ्यांनी विरोध सुरू केला. त्यातून वाद सुरू झाला. सर्वच शेतकरी एकत्र आले. त्यांनी 6 हजार रुपये भाव देण्याची मागणी केली. व्यापारी आणि शेतकऱ्यांतील वादात काही जणांनी दगडफेक केली. त्यामुळे पळापळ सुरू झाली. परिस्थिती बिघडल्याचे कळताच पोलीस बाजार समितीत धावले. अखेर शेतकऱ्यांना शांत करून प्रशासक महेश कृपलानी, सचिव मुकुंटराव भिसे, शेतकरी प्रतिनिधी गजानन लोखंडकार, कैलास फाटे, गणेश चौकसे, पोलीस उपविभागीय अधिकारी अमोल कोळी यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. बैठकीत हमीभावाची मागणी शेतकऱ्यांनी लावून धरली. अखेर दर्जा पाहून भाव देण्याचा निर्णय घेतला. दुपारी दोननंतर चार हजारांपासून साडेपाच हजारांपर्यंत भाव देण्यात आला. मात्र हा तोडगा समाधानकारक नसल्याच्या प्रतिक्रिया शेतकऱ्यांत उमटल्या.
तेलाचे दर वाढतेच, मग भुईमुगाला इतका कमी दर का?
सध्या खाद्यतेलाचे दर प्रचंड वाढलेले आहेत. भूईमुग हे तेलवान आहे. त्यामुळे खरेतर भूईमुगाची कितीही आवक झाली तरी भाव पाडण्याचा विषयच येत नाही. पण तरीही नेहमीप्रमाणे शेतकऱ्याला अडचणीत आणण्याचे प्रकार घडला. मात्र ज्या शेतकऱ्यामुळे बाजार समिती आहे, आपण आहोत तोच संपला तर आपण राहू का, हा साधा विचारही व्यापाऱ्यांना येऊ नये का? त्यांना नाडण्याचे प्रकार कायमस्वरुपी कधी संपणार?