…तर 26 जानेवारीला मुला-बाळांसह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महिला करणार उपोषण!; प्रशासकीय हलगर्जीपणामुळे अनुकंपा यादीत नाव नसल्याने आक्रोश!

शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः पती शेगाव नगर परिषदेत चतुर्थ श्रेणी पदावर कार्यरत असताना त्यांचे निधन झाले. त्यांच्या जागेवर अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळावी म्हणून नगर परिषद प्रशासनाकडे वारंवार अर्ज केले. मात्र जिल्हाधिकारी कार्यालयातद्वारे जाहीर अनुकंपाच्या प्रारुप प्रतीक्षा यादीत नाव समाविष्ट करण्यात आले नाही. त्यामुळे अन्यायग्रस्त महिलेने प्रारूप यादीवर लेखी आक्षेप नोंदविला असून …
 

शेगाव (ज्ञानेश्‍वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः पती शेगाव नगर परिषदेत चतुर्थ श्रेणी पदावर कार्यरत असताना त्यांचे निधन झाले. त्यांच्या जागेवर अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळावी म्हणून नगर परिषद प्रशासनाकडे वारंवार अर्ज केले. मात्र जिल्हाधिकारी कार्यालयातद्वारे जाहीर अनुकंपाच्या प्रारुप प्रतीक्षा यादीत नाव समाविष्ट करण्यात आले नाही. त्यामुळे अन्यायग्रस्त महिलेने प्रारूप यादीवर लेखी आक्षेप नोंदविला असून यादीत नाव समाविष्ट करून न्याय देण्याची मागणी जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे. अन्यथा 26 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुला-बाळांसह उपोषणास बसण्याचा इशाराही दिला आहे.

भीमराव काळुबा गायकवाड हे शेगाव नगर परिषदेच्या कचरा डेपो येथे पूर्णवेळ 24 तासांकरिता शिपाई पदावर कार्यरत होते. त्यांचे जुलै 2011 रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यानंतर त्यांच्या पश्‍चात कुटुंबाच्या पालन पोषणाची जबाबदारी त्यांची पत्नी श्रीमती कुसुम भीमराव गायकवाड यांच्यावर आली. शासकीय नियमांना अनुसरून श्रीमती गायकवाड यांनी अनुकंपा तत्वावर नोकरी मिळावी म्हणून नगर परिषद प्रशासनाकडे 11 नोव्हेंबर 2011 रोजी विविध नमुन्यांत रितसर अर्ज केला होता. मात्र त्यानंतर नगर परिषदेकडून अर्ज गहाळ झाल्याच्या कारणामुळे श्रीमती गायकवाड यांचे नाव अनुकंपा यादीत समाविष्ट झाले नव्हते. या बाबतची माहिती श्रीमती गायकवाड यांना मिळाल्यानंतर त्यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे 29 ऑगस्ट 2016 रोजी त्या संदर्भात तक्रार दिल्यानंतर तत्कालिन मुख्याधिकारी अतुल पंथ यांनी श्रीमती गायकवाड यांचा अर्ज आढळला असून, त्यांचे नाव यादीत समाविष्ट केले जाईल असे 16 डिसेंबर रोजी जिल्हाधिकार्‍यांना एका पत्राद्वारे कळविले. असे असताना जिल्हाधिकार्‍यांनी 22 डिसेंबर 2020 रोजी प्रसिद्धीस दिलेल्या अनुकंपा तत्त्वावरील प्रतीक्षा यादीत श्रीमती गायकवाड यांचे नाव समाविष्ट करण्यात आलेले नाही. ही बाब लक्षात आल्यावर आपल्यावर अन्याय झाल्याचे लक्षात आल्याने श्रीमती गायकवाड यांनी जिल्हाधिकार्‍यांनी प्रसिद्धीस दिलेल्या अनुकंपा तत्त्वावरील प्रतीक्षा यादीवर आक्षेप नोंदवला आहे. अनुकंपा यादीत नाव समाविष्ट न झाल्यास 26 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुला-बाळासह उपोषणास बसण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.