जवळच्या मित्रांकडूनच विश्वासघात; मोबाइल हातात घेतला अन्‌ त्‍याचा केला “कार्यक्रम’!; खामगाव शहरातील घटना

खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः विश्वासू मित्रांनी आर्थिक फसवणूक करून विश्वासघात केल्याची तक्रार खामगावच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. मनोज तेजराव झांबड (४९, रा. केशवनगर, खामगाव) यांनी २५ सप्टेंबर रोजी याप्रकरणाची तक्रार दिली आहे. मनोज झांबड यांचा मुलगा, मुलगी औरंगाबादला शिक्षण घेतात. त्यांची पत्नी मुलासोबत औरंगाबादला राहते. त्यामुळे मनोज झांबड खामगाव येथे एकटेच राहतात. …
 

खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः विश्वासू मित्रांनी आर्थिक फसवणूक करून विश्वासघात केल्याची तक्रार खामगावच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. मनोज तेजराव झांबड (४९, रा. केशवनगर, खामगाव) यांनी २५ सप्टेंबर रोजी याप्रकरणाची तक्रार दिली आहे.

मनोज झांबड यांचा मुलगा, मुलगी औरंगाबादला शिक्षण घेतात. त्यांची पत्नी मुलासोबत औरंगाबादला राहते. त्यामुळे मनोज झांबड खामगाव येथे एकटेच राहतात. मुलांना शिक्षणासाठी पैसे पाठवण्यासाठी ते फोन पेचा वापर करतात. त्यांचे अतिशय विश्वासू आणि जवळचे मित्र विशाल वडोदे (रा. करवीर कॉलनी, खामगाव) व गणेश सरोदे (रा. चिंतामणीनगर, खामगाव) या दोघांना मनोज झांबड यांचा फोन पे पासवर्ड माहीत आहे, असे तक्रारीत म्हटले आहे. १३ सप्टेंबरच्या संध्याकाळी साडेसहा वाजता दोन्ही मित्र मनोज यांच्या घरी आले. त्यावेळी ते झोपलेले होते.

मित्रांनी त्यांना झोपेतून उठवले. त्यांनी मनोज यांचा मोबाइल हातात घेतला व काहीतरी केले. नंतर मोबाइल देऊन टाकला. थोड्यावेळाने मित्र निघून गेले. दुसऱ्या दिवशी मनोज यांच्या मुलीने फोन करून शाळेच्या फीसाठी पैसे पाठवण्यास सांगितले. तेव्हा मनोज यांनी फोन पे उघडले असता त्यांच्या खात्यातून १५ हजार व १० हजार असे २५ हजार रुपये विनायक लोणकर यांना सेंड झाल्याचे दिसले. त्यांनी बँकेत जाऊन स्टेटमेंट चेक केल्यावरही २५ हजार रुपये १३ सप्टेंबरच्या सायंकाळी ७ वाजता गायब झाल्याचे त्यांना समजले. ज्या मित्रांवर विश्वास ठेवून मोबाइल त्यांच्या हातात दिला त्यांनीच ही फसवणूक केल्याने २५ सप्टेंबर रोजी त्यांनी मित्रांची तक्रार दिली. तक्रारीवरून गणेश सरोदे व विशाल वडोदे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.