जळगाव जामोद, संग्रामपूर तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू!
जळगाव जामोद (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जळगाव जामोद उपविभागात जळगाव जामोद व संग्रामपूर तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने 18 जानेवारीपर्यंत आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.
आचार संहितेचा भंग होऊ नये या दृष्टीकोनातून फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 उपविभागात लागू करण्यात आले आहे. त्यानुसार ग्रामपंचायत निवडणुकीच्या कालावधीत उमेदवारांना प्रचारावेळी त्यांच्या वाहन ताफ्यात एकापेक्षा जास्त वाहन वापरता येणार नाही. निवडणुकीच्या प्रचारासाठी वापरायच्या वाहनांची परवानगी संपूर्ण ग्राम पंचायत क्षेत्रासाठी संबंधीत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून घेणे आवश्यक आहे. प्रचार कार्यासाठी संबंधित निवडणूक अधिकारी यांच्याकडे नोंदणी न करण्यात आलेले कोणतेही वाहन प्रचार कार्यासाठी वापरता येणार नाही. तसेच उपविभागात ग्रामपंचायत मतदान केंद्र, धार्मिक स्थळे, दवाखाने आणि शैक्षणिक संस्था यापासून 200 मीटरच्या आत कोणताही मंडप तथा कार्यालय उभारण्यास बंदी असणार आहे. तसेच जेथे एकाच मतदान केंद्राच्या ठिकाणी किंवा त्याच्या जागेत एकापेक्षा जास्त मतदान केंद्र असतील तेथे अशा मतदान केंद्रांच्या गटासाठी त्या जागेच्या 100 मीटरचे अंतरापलीकडे उमेदवाराचा केवळ एकच मंडपाला परवानगी आहे.
उमेदवाराला ज्या ठिकाणी मंडप उभारावयाचा आहे त्या ठिकाणी 3 बाय 4.5 फुटांचा एक बॅनर वापरता येणार आहे. ज्या उमेदवाराला असे मंडप उभारावयाचे असतील अशा प्रत्येक उमेदवाराने ज्या मतदान केंद्रावर मंडप उभारावयाचे आहेत, त्या मतदान केंद्राचे नाव, अनुक्रमांक याबाबतची लेखी माहिती संबंधित निवडणूक अधिकर्यांना आगाऊ कळवावी. असे मंडप उभारताना स्थानिक प्राधिकरणाकडून लेखी परवानगी घेतली पाहिजे. मतदारांना मतदान यादीतील अनुक्रमांक देण्याच्या एकमेव प्रयोजनाकरिताच केवळ या मंडपाचा वापर करण्यात आला पाहिजे. अशा मंडपामध्ये कोणत्याही परिस्थितीत गर्दी करण्यास मुभा असणार नाही. मतदान केंद्रातून मत देऊन बाहेर पडलेल्या व्यक्तीस मंडपात येण्याची मुभा असणार नाही. मंडप सांभाळणार्या व्यक्तींनी मतदान केंद्राकडे जाणार्या मतदारांच्या मार्गात कोणताही अडथळा निर्माण करण्यास किंवा त्यांना दुसर्या उमेदवारांच्या मंडपात जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. उपविभागात निवडणुकीत सर्व राजकीय पक्ष, संघ, संस्थाने उमेदवार, प्रतिनिधी यांनी सार्वजनिक जागा, शासकीय व निमशासकीय कार्यालयाचे इमारत व जागेवरील लावलेली भिंतीपत्रके, फलक, पोस्टर्स, बॅनर्स कट आऊट त्वरित काढून टाकावीत. तसेच खासगी जागा, इमारतीवरील संबंधित जागा मालकाचे लेखी संमतीशिवाय लावलेली भिंतीपत्रके, फलक, पोस्टर्स, बॅनर्स, कट आऊट त्वरित काढून टाकावीत.
उपविभागात मतदानाचे दिवशी मतदान केंद्र व परिसरात जमाव करण्यास, मतदारांना घाबरविण्यास, बळजबरीने मतदान करण्यास किंवा मतदान न करण्यास प्रवृत्त करणे, उमेदवाराच्या निवडणूक चिन्हाचे प्रदर्शन करणे, मोबाईल फोन, कॉर्डलेस फोन, पेजर, वायरलेस सेट व इतर इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांचा वापर करणे, वाहनांचा प्रवेश, मतदान केंद्रामध्ये अनधिकृत प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे. उपविभागात ग्रामपंचायत निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी, तहसील कार्यालय येथून होणार असल्याने व तहसील कार्यालयात मतमोजणी केंद्र व सुरक्षा कक्ष प्रस्तावित असल्याने तहसील कार्यालयाच्या आवारात केवळ 4 व्यक्तींना परवानगी असणार आहे. तसेच मिरवणुकीने येत असल्यास निवडणूक निर्णय अधिकार्यांच्या कार्यालयापासून 100 मीटरच्या आत मिरवणूक थांबवणे बंधनकारक असणार आहे. तसेच निवडणूक निर्णय अधिकार्यांच्या कक्षात कोविड 19 च्या मार्गदर्शक सुचनेनुसार 4 पेक्षा जास्त व्यक्तींना प्रवेशास बंदी असणार आहे. तथापी हा आदेश मतदानाशी संबंधित अधिकारी, सर्व पोलीस अधिकारी, सुरक्षा पथकातील कर्मचारी, निवडणूक निरीक्षक यांना लागू असणार नाही. या आदेशाचे उल्लंघन केल्यास भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 नुसार कार्यवाही करण्यात येणार आहे, असे जळगाव जामोदचे उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी कु. वैशाली देवकर यांनी कळविले आहे.