जळगाव जामोद तालुक्यावर महाविकास आघाडीचे वर्चस्व; भाजपचा धक्कादायक पराभव

जळगाव जामोद (गणेश भड ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जळगाव जामोद तालुक्यातील 23 ग्रामपंचायतीची निवडणूक 15 जानेवारीला होऊन आज, 18 जानेवारीला मतमोजणी पार पडली. सकाळी 9 पासून शासकीय धान्य गोदामात कडक बंदोबस्तात मतमोजणीला सुरुवात झाली. भाजपचा तालुक्यात धक्कादायक पराभव झाला असून, महाविकास आघाडीने वर्चस्व सिद्ध केले आहे. तालुक्यातील पिंपळगाव (काळे) ग्रामपंचायतीवर काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष तथा …
 

जळगाव जामोद (गणेश भड ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जळगाव जामोद तालुक्यातील 23 ग्रामपंचायतीची निवडणूक 15 जानेवारीला होऊन आज, 18 जानेवारीला मतमोजणी पार पडली. सकाळी 9 पासून शासकीय धान्य गोदामात कडक बंदोबस्तात मतमोजणीला सुरुवात झाली. भाजपचा तालुक्यात धक्कादायक पराभव झाला असून, महाविकास आघाडीने वर्चस्व सिद्ध केले आहे.

तालुक्यातील पिंपळगाव (काळे) ग्रामपंचायतीवर काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष तथा माजी जि. प. अध्यक्ष प्रकाश पाटील-अवचार यांच्या पॅनलने एकतर्फी विजय मिळवला आहे. जि. प. सदस्य बंडू पाटील यांचे पॅनल तिथे पराभूत झाले आहे. यापूर्वी या ग्रामपंचायतीवर भाजपची सत्ता होती. तालुक्यात पिंपळगाव काळे येथेसुद्धा प्रकाश पाटील यांची प्रतिष्ठा सुद्धा पणाला लागली होती. त्यांच्या नेतृत्वातील पॅनलला 17 पैकी 12 जागांवर विजय मिळाला. तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या विजयासाठी माजी जि. प. अध्यक्ष प्रकाश पाटील, शिवसेना जिल्हा सह संपर्क प्रमुख दत्ता पाटील, काँग्रेस पक्षनेत्या डॉक्टर स्वाती वाकेकर, जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्ष ज्योती ढोकणे यांच्यासह पदाधिकार्‍यांनी अथक परिश्रम घेतले. तिसरी मोठी ग्रामपंचायत आसलगाव येथे परिस्थिती संमिश्र आहे. तालुका काँग्रेसचे अध्यक्ष अविनाश उमरकर यांच्या वडशिंगी या गावामध्ये सुद्धा त्यांच्या पॅनलला बहुमत मिळाले आहे. धानोरा महासिद्ध येथे ग्रामसमृध्दी पॅनलने बाजी मारली. शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख दत्ता पाटील यांचे उसरा हे गाव गट ग्रामपंचायत सुनगाव अंतर्गत येते. राजकीय वादामुळे दत्ता पाटील आणि कुटुंबीयांवर हल्ला झाला होता. त्या प्रभागातील तिन्ही जागा दत्ता पाटील यांच्या महाविकास आघाडी पॅनलने काबीज केल्या आहेत.सुनगाव येथे विद्यमान भाजपचे जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती उपसभापती यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. त्यांना 17 पैकी 8 जागांवर समाधान मानावे लागले. महाविकास आघाडीला 8 जागा व 1 अपक्ष उमेदवार विजयी झाला. त्यामुळे सरपंच पदाची चाबी अपक्ष उमेदवाराकडे आली आहे.