जलंब परिसरात आता हरभरा संकटात!
जलंब (संतोष देठे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मूग, उडीद, सोयाबीन, तुरीचे अस्मानी संकटाने नुकसान केले असताना आता हरभरा पिकावर वातावरणात बदलामुळे रोग पडला आहे. उपाययोजना करूनही उपयोग नसल्याने उत्पन्नात मोठी घट येणार आहे. पीक विम्याचा लाभ शेतकर्यांना मिळण्याची अपेक्षा आहे.
शेगाव तालुक्यातील जलंब परिसरात गेल्यावर्षी सुरुवातीपासून पिकावर अस्मानी संकटे येत गेली. सुरुवातीला अतिवृष्टीमुळे मूग, उडीद, सोयाबीन पिकाचे नुकसान झाले. मध्यंतरी कापूस पिकावर शेंदरी बोंड अळी आल्यामुळे कापसाच्या उत्पादनात घट झाली. तूर हे पीक साधारण चांगले होते. परंतु व्हायरस आल्यामुळे पिक सोंगणी करिता लवकर आले. त्यामुळे उत्पन्नात थोडीफार घट झाली. तसेच हरभरा या पिकावर शेतकर्यांची आशा उरलेली होती. परंतु हरभरा पिकावर धुरीमुळे फुल अवस्थेत असताना फुलगळ झाली. त्यामुळे या पिकाची उत्पन्नात घट झाली. सध्या हरभरा पिकावर वातावरणात बदल होत असल्यामुळे रोग आलेला आहे. या परिसरातील बर्याच शेतकर्यांनी पीक विमा काढलेला आहे. अद्यापपर्यंत पिक विम्याबाबत ठोस निर्णय झालेला नाही. पिक विमा मिळावा अशी मागणी या परिसरातील शेतकरी करत आहेत.