चितोड्यावरून राजकारण पेटले… तुम्ही 10 हजार घेऊन या आम्ही पाचशेच आणतो; ऑल इंडिया पँथर सेनेचे आमदार गायकवाडांना आव्हान; खासदार जाधव, आमदार फुंडकर,आणि गायकवाड यांचा जातीय दंगली घडवण्याच्या हेतू असल्याचा आरोप
खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः तुम्ही 10 हजारांची फौज आणा. आम्ही पाचशेच आणतो. आम्हाला भीमा कोरेगावचा इतिहास आहे, असे आव्हान ऑल इंडिया पँथर सेनेचे दीपक पवार यांनी बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड यांना दिले आहे. चितोडा (अंबिकापूर) येथे आज, 30 जूनला आमदार संजय गायकवाड यांनी भेट देऊन वाघ कुटूंबियांशी चर्चा केली. यानंतर पुन्हा असा हल्ला इथे झाला तर मी स्वतः 10 हजारांची फौज घेऊन येतो व सगळ्यांना एका फटक्यात सरळ करतो, असे विधान आमदार गायकवाड यांनी केले होते. आमदार गायकवाड चितोड्यातून बाहेर पडत नाही तोच ऑल इंडिया पँथर सेनेचे दीपक केदार यांनी चितोडा येथे भेट दिली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत केदार यांनी खासदार जाधव, आमदार फुंडकर, गायकवाड यांच्यावर सडकून टीका केली.
19 जूनला चितोडा येथील रमेश हिवराळे (35) या युवकावर प्राणघातक हल्ला झाला. पोटात चाकूने वार करण्यात आले. त्याच्यावर 3 सर्जरी झाल्या. तो सध्या मृत्यूशय्येवर आहे. असे असताना खासदार जाधव यांनी आरोपी असलेल्या वाघ कुटूंबाला पाठिशी घालण्याचे काम केले आहे. दोन कुटूंबात असलेल्या या वादाला खासदार जाधव, आमदार फुंडकर, गायकवाड, एकडे यांनी जातीय स्वरूप दिले. खासदार जाधव यांनी गावाला भेट देऊन सामाजिक तेढ व जातीय दंगली भडकावण्याच्या उद्देशाने विधाने केली. वास्तविक कुणीही वाघ कुटूंबांच्या घरावर हल्ला केला नाही व कोणी चोरीही केली नाही. मात्र लोकप्रतिनिधी चुकीची विधाने करत आहेत. खामगाव ग्रामीणचे ठाणेदार रफिक शेख हे मुस्लिम व बिट जमादार गाडेकर दलित असल्यानेच जातीय मानसिकतेतून त्यांच्या निलंबनाची मागणी खासदार जाधव यांनी केली आहे. याप्रकरणी खासदारांच्या दबावामुळे जे अटकसत्र पोलिसांनी सुरू केले आहे त्या युवकांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचेही केदार म्हणाले.
रमेश हिवराळे हा तरुण गावात सामाजिक कार्य करीत होता. गावचा सरपंचसुद्धा अनुसूचित जातीचा असल्याने काहींच्या पोटात दुखत होते. खामगाव हे आरएसएसचे केंद्र आहे. महाराष्ट्रात पुढील काळात जिल्हा परिषद ,नगरपरिषदेच्या निवडणुका आहेत. त्या डोळ्यासमोर ठेवून आरएसएसने हे कांड घडवले असल्याचेही केदार यांनी म्हटले आहे.
बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी ॲट्रॉसिटी संदर्भात केलेले विधान भडकाऊ आणि चिथावणीखोर आहे. शस्र अस्त्र पुरवण्याची भाषा ते करतात. चितोडा येथे येण्यासाठी मातोश्रीवरून आदेश आल्याचे ते सांगतात. त्यामुळे ॲट्रॉसिटीच्या संदर्भात गायकवाड यांनी केलेल्या विधानाचे उत्तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी द्यावे. खासदार जाधव, आमदार गायकवाड हे लोकप्रतिनिधी नाहीत तर दहशतवादी आहेत. त्यांच्याविरुद्धच आता ॲट्रॉसिटीचे गुन्हे दाखल करावे. चितोडा येथील तरुणांचे अटकसत्र थांबवावे. लोकप्रतिनिधींना गावात जाण्यास मज्जाव करावा अन्यथा भिमसैनिक रस्त्यावरचा संघर्ष करतील, असेही केदार म्हणाले.