खामगावमध्ये कोसळली दुमजली इमारत!; वेळीच कुटुंब बाहेर पडल्याने बचावले!!
खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः खामगाव येथील सराफा भागातील जैन मंदिर मंदिराजवळील दुमजली जीर्ण इमारत अचानक कोसळली. सुदैवाने प्राणहानी टळली आहे. मात्र संसारउपयोगी साहित्याचे नुकसान झाले आहे. ही घटना आज, १६ जुलैला सकाळी अकराच्या सुमारास घडली.
शहरातील सराफा भागात जितेंद्र प्रकाश चव्हाण यांचे दुमजली घर आहे. घरात २ मुले, पत्नी व आई कुटुंबासह ते राहतात. गेल्या काही वर्षांपासून ही इमारत जीर्ण झाली होती. अधून – मधून भिंतीसुध्दा खचत होत्या. आज सकाळी घराच्या भिंती खचत असल्याचे जितेंद्र चव्हाण यांच्या लक्षात आले. त्यामुळे चव्हाण यांनी पत्नी, मुले यांना सुरक्षित घराबाहेर काढले व आईला घरातून बाहेर काढण्यासाठी जात असतानाच अचानक इमारत कोसळली. यात घरातील जीवनावश्यक वस्तूंसह टी.व्ही, कुलर, फ्रीज आदी साहित्याचे नुकसान झाले.
दरम्यान या घटनेची माहिती नगरपालिका अधिकारी, तसेच शिवाजीनगर पोस्टेला मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेवून बचावकार्याला मदत केली. आमदार अॅड. आकाश फुंडकर यांनीही भेट देऊन चव्हाण कुटूंबियांना धीर दिला व संपूर्ण बचावकार्य होईपर्यंत उपस्थिती दर्शविली. विशेष म्हणजे ११ जुलैच्या रात्री बारादरी भागातील प्रभाकर आळशी यांचेही दुमजली घर रात्री ११ वाजेच्या दरम्यान कोसळले होते. हे घर शेजारच्या बांधकामासाठी केलेल्या खोल खड्ड्यामुळे कोसळल्याचे पुढे आले होते. यात सुध्दा सुदैवाने जिवित हानी झाली नव्हती. शहरातील जुन्या वस्तीमध्ये अनेक इमारती जीर्ण झाल्या आहेत. यामध्ये सराफा, फरशी, शिवाजी वेस, मेनरोड या व इतर भागाचा समावेश आहे. या धोकादायक इमारतींमुळे मोठ्या दुर्घटनेला निमंत्रण मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. जीर्ण इमारती आजही वापरात असल्यामुळे भविष्यात मोठे काही अघटित घडण्याआधी नगरपरिषदेने ल्ाक्ष देण्याची गरज आहे.