क्षारयुक्त पाणी पिल्याने जनावरांना विषबाधा, दोन म्हशी, एका बैलाचा मृत्यू, ७ जनावरांवर उपचार सुरू; शेगाव तालुक्यातील भोनगावची घटना
शेगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः आठवडे बाजारात असलेल्या हौदातील पाणी पिल्याने जनावरांना विष बाधा झाली. यात दोन म्हशी व एक बैल दगावला. ७ जनावरांवर शेगाव येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचार सुरू आहेत. ही घटना ११ सप्टेंबरला शेगाव तालुक्यातील भोनगाव येथे घडली.
दगावलेली जनावरे गणेश पवार, शुभम पाचपोहे आणि गजानन पांडे यांची होती. पशुपालकांनी शासनाकडून मदतीची अपेक्षा केली आहे. या घटनेबद्दल पशुधन पर्यवेक्षक डॉ. रतन देवकते यांनी सांगितले, की जनावरांनी पिलेले पाणी क्षारयुक्त होते. त्यामुळे विषबाधा झाली. डॉ. देवकते यांच्यासह डॉ. सातपुते, नंदू भारसाकळे जनावरांवर उपचार करत आहेत.
नक्की काय घडले…
भोनगाव ग्रामपंचायतीचा बोअरवेल आहे. मात्र तो गेल्या काही वर्षांपासून बंद होता. सध्या नदीला पूर आल्याने गुरांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व्हावी म्हणून तो सुरू करून त्याचे पाणी हौदात सोडण्यात आले. ते जनावरांनी पिले आणि विषबाधा झाली.