ऐकावं ते नवलंच… अचानक विहिरीतून गरम पाणी येऊ लागल्याने चक्रावले गावकरी!; संग्रामपूर तालुक्यातील आश्चर्यकारक घटना
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः अकोली (ता. संग्रामपूर) येथील एक विहीर सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. या विहिरीतील पाणी अचानक गरम झाल्याने वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले आहे. ही माहिती मिळताच संग्रामपूरच्या तहसीलदारांनी घटनास्थळी भेट देऊन पाण्याचे नमुने भूवैज्ञानिक विभागाकडे तपासणीसाठी पाठविले आहेत.
अकोली बुद्रूक येथे भानुदास भगवान सोळंकी यांची त्यांच्या घरासमोरच बेंबळा नदीकाठावर १५ वर्षे जुनी खाजगी विहीर आहे. या विहिरीवरूनच ते रोज पाणी भरतात. मात्र १४ जुलैपासून या विहिरीचे पाणी सातत्याने गरम येत असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. विशेष म्हणजे या विहिरीपासून काही अंतरावर २० ते २५ फूट अंतरावर असलेल्या विहिरीचे पाणी मात्र थंड आहे. यासंबंधीची माहिती मिळताच १९ जुलैला संग्रामपूरचे प्रभारी तहसीलदार विजय चव्हाण व तलाठी पी. व्ही. खेडेकर यांनी विहिरीची पाहणी केली. पाण्याचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
अकोली खुर्द येथील त्या विहिरीतील पाण्याचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठविले आहेत. दोन- तीन दिवसांत याबाबतचा अहवाल आल्यानंतर पाणी गरम कशाने झाले हे समोर येईल.
– विजय चव्हाण, प्रभारी तहसीलदार, संग्रामपूर