एका शाळेत दारू-मटनाची पार्टी, दुसऱ्या शाळेत कंडोमची पाकिटे!; संग्रामपूर तालुक्‍यातील अनोखी “शाळा’; तीन शिक्षक निलंबित

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः विद्येचे पवित्र मंदिर असलेल्या शाळेतच दारू- मटणाची ओली पार्टी करणाऱ्या दोन शिक्षकांना जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने निलंबित केले आहे. यासोबतच दुसऱ्या एका जिल्हा परिषद शाळेच्या आवारात कंडोमच्या पाकिटांचा कचरा आढळल्याने शाळेच्या मुख्याध्यापकांना निलंबित करण्यात आले आहे. संग्रामपूर तालुक्यातील हडियामहाल आणि शिवनी येथील शाळेतील शिक्षकांवर काल, १७ सप्टेंबर रोजी ही कारवाई …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः विद्येचे पवित्र मंदिर असलेल्या शाळेतच दारू- मटणाची ओली पार्टी करणाऱ्या दोन शिक्षकांना जिल्हा परिषदेच्‍या शिक्षण विभागाने निलंबित केले आहे. यासोबतच दुसऱ्या एका जिल्हा परिषद शाळेच्या आवारात कंडोमच्या पाकिटांचा कचरा आढळल्याने शाळेच्या मुख्याध्यापकांना निलंबित करण्यात आले आहे. संग्रामपूर तालुक्यातील हडियामहाल आणि शिवनी येथील शाळेतील शिक्षकांवर काल, १७ सप्टेंबर रोजी ही कारवाई करण्यात आल्याची माहिती शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी बुलडाणा लाइव्हला दिली आहे.

संग्रामपूर तालुक्यातील हडियामहाल येथील जिल्हा परिषद शाळेच्या आवारात कंडोमची पाकिटे आढळली होती. त्यामुळे शाळेचे मुख्याध्यापक इरफान सुरत्ने यांना निलंबित करण्यात आले आहे. निलंबन काळात त्यांना बुलडाणा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या एका शाळेत हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. संग्रामपूर तालुक्यातीलच शिवनी येथील जिल्हा परिषद शाळेत मद्य प्राशन करून शिक्षकांनी मटणाची पार्टी केली. या शाळेतील सहाय्यक अध्यापक मनोज ठोंबरे यांचे निलंबन करून त्यांना निलंबन काळात मेहकर पंचायत समिती अंतर्गत बेलगाव येथील शाळेत हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याच शाळेतील दुसरे शिक्षक शांताराम चव्हाण यांचे निलंबन करून त्यांना निलंबन काळात लोणार पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या गायखेड येथील शाळेत हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या दोन्ही घटनेचे व्हिडिओ शिक्षण विभागाला प्राप्त झाले होते. व्हिडिओची सत्यता तपासून ही कारवाई करण्यात आल्याचे शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी बुलडाणा लाइव्हशी बोलताना सांगितले.