एका मिनिटात लाखमोलाचे कार्य… यालाच म्हणतात समाजकार्य!; नांदुऱ्यातील हा उपक्रम जिल्ह्यात ठरतोय कौतुकाचा!
नांदुरा (प्रविण तायडे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणी मास्क वाटप तर कोणी सॅनिटायझर वाटप करून सामाजिक बांधिलकी जपतात. नांदुरा शहरात असाच मदतीचा हात म्हणून सामाजिक कार्यकर्त्यांनी नागपूर येथून ऑक्सिजन घेऊन निघालेल्या ट्रेनमधील चालक व कर्मचाऱ्यांना जेवण व नास्ता उपलब्ध करून दिला.
नागपूरपासून ही ट्रेन कुठेच थांबत नसल्याने हा उपक्रम राबविण्यात आला. त्यासाठी नांदुरा स्टेशन मास्टर यांच्या सोबत चर्चा करून फक्त एक मिनिट ही गाडी ब्रेक करून सर्व पंचवीस लोकांना जेवण व बिस्लरी बॉटलचे वाटप करण्यात आले. ही ऑक्सिजन ट्रेन पुढे नाशिकपर्यंत रवाना झाली. यावेळी नांदुरा शहरातील नंदूभाऊ कानडे यांनी जेवणाची व्यवस्था करून दिली. कार्यक्रम व्यवस्थापक प्रमोद हिवाळे (शहर उपाध्यक्ष भाजप), पियुष मिहानी, दत्त भोडोकार, सुनील गांधी, राहुल कानडे, मंगेश कासार, रोहन बुरुकले, अक्षय नारखेडे यांनी सहकार्य केले.