आमदार संजय कुटेंचा मंत्रालयात तीन तास ठिय्या आंदोलन!; अधिकाऱ्यांनी रिक्वेस्ट केली तेव्हा म्हणाले, १५ दिवसांत निर्णय झाला नाही तर सोळावा दिवस माझा!!
जळगाव जामोद (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः पीक विम्याच्या प्रश्नावर आमदार संजय कुटे आक्रमक झाले आहेत. आज, १६ सप्टेंबर रोजी आ. कुटे यांनी निवडक शेतकऱ्यांसह मुंबई येथे मंत्रालयासमोर तीन तास ठिय्या आंदोलन केले. पीक विम्या प्रश्नासंदर्भात ठोस आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याची भूमिका त्यांनी घेतली होती. संध्याकाळी सव्वासातला कुटे यांच्याशी अधिकाऱ्यांनी चर्चा केली. १५ दिवसांत प्रश्न मार्गी लावण्यात येईल, असे आश्वासन कृषिमंत्र्यांच्या वतीने अधिकाऱ्यांनी दिले. त्यानंतर कुटेंनी आंदोलन मागे घेतले. संयमित कार्यकर्ता असल्याने शासनाची विनंती मान्य करून आंदोलन मागे घेतो. ७ महिन्यांपासून पीक विम्याची वाट पहात आहोत आणखी १५ दिवस वाट पाहू ,मात्र १५ दिवसांत निर्णय झाला नाही तर सोळावा दिवस माझा असेल, असा इशाराही कुटेंनी दिला.
१ सप्टेंबर रोजी पीक विम्याच्या संदर्भात कृषी मंत्र्यांच्या दालनात बैठक झाली होती. बैठकीत खासदार जाधव यांच्यासह जिल्ह्यातील सर्वच आमदार उपस्थित होते. त्यावेळी १५ सप्टेंबरपर्यंत शेतकऱ्यांना पीक विमा वितरीत केला नाही तर आंदोलन करण्याचा इशारा आमदार संजय कुटे यांनी दिला होता. मात्र राज्य सरकार आणि रिलायन्स कंपनीकडून कोणताच प्रतिसाद न मिळाल्याने आज कुटे यांनी निवडक शेतकऱ्यांना घेऊन गोरेगाव येथील कंपनीचे कार्यालय गाठून अधिकाऱ्यांना धारेवर धरले. त्यानंतर आमदार कुटे यांनी मंत्रालय गाठून दुपारी ४ वाजेपासून मंत्रालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले. पीक विम्यासंदर्भात सरकार कंपनीकडे तर कंपनी सरकारकडे बोट दाखवते. यामुळे गरीब शेतकऱ्यांचे मरण होत आहे. ठोस आश्वासन मिळेपर्यंत ठिय्या आंदोलन सुरूच ठेवण्याची भूमिका कुटे यांनी घेतली होती.