अवैधरित्या निंबाची लाकडे घेऊन जाणारे वाहन पकडले; वडाळी फाट्यावर वनविभागाची कारवाई
मोताळा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मोताळा वनपरिक्षेत्रातून नांदुरा – मोताळा रस्त्याने टाटा 407 वाहनातून विना परवानगीने निंबाचे अवैध लाकूड वाहतूक सुरू होती. या वाहनावर वडाळी शिवारातील माऊली पेट्रोल पंपाजवळ कारवाई करण्यात आली. वाहनाला हात देवून थांबविण्यात आले.
वाहन चालक शे. रजीक शे. महबुब (22, रा. वसाडी खुर्द ता. नांदुरा) यास परवानगी व पास परवानाबाबत विचारले असता त्याने परवानगी व पास नसल्याचे सांगितले. याबाबत वाहन चालकाकडे अधिक चोकशी केली असता वाहन चालकाने ही लाकडे शेंबा शिवारातून गाडी मालक शे. शाकीर शे जफीर (रा. वसाडी खुर्द) यांनी आणावयास सांगितल्याची माहिती दिली. याप्रकरणी वाहन (क्रमांक एमएच 27 ए 4011) मध्ये निंबाची 08.00 घ.मी. लाकडे अवैधरित्या वृक्षतोड करून वाहतूक करण्याबाबत वनगुन्हा नोंदविण्यात आला. जप्त करण्यात आलेले वाहन टाटा 407 मोताळा वनपरिक्षेत्र कार्यालयात जप्त करून ठेवण्यात आले आहे, असे उपवनसंरक्षक अक्षय गजभिये यांनी कळविले आहे.