विहरीत आढळला विवाहितेचा मृतदेह; सासरच्यांनी ढकलून मारल्याचा पित्याचा आरोप! खामगांव तालुक्यातील हिंगणा कारेगाव ची घटना...
May 11, 2024, 13:18 IST
खामगाव( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): पाणी आणण्यासाठी गेलेल्या विवाहितेचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना खामगाव तालुक्यातील हिंगणा कारेगाव शिवारात गुरुवारी उघडकीस आली. मात्र, हा अपघात नसून पतीसह सासरच्या लोकांनी विहिरीत ढकलून मुलीस ठार मारल्याचा आरोप मृत महिलेच्या वडिलांनी केला आहे. तशी तक्रार खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली आहे.
तालुक्यातील नांद्री येथील काही मेंढपाळ मेंढ्या घेऊन चराईसाठी हिंगणा करेगाव शिवारात आले आहेत. ९ मे रोजी सकाळी सोबत असलेली पल्लवी संदीप कुल्हाड (१९) ही शेषराव चव्हाण यांच्या शेतीतील विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेली होती. पाय घसरून विहिरीत पडल्याने तिचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. काही वेळाने ही घटना उघडकीस आल्यानंतर गावात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच खामगाव ग्रामीण घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूयी नोंद करून तपास सुरू केला. दरम्यान, मृत पल्लवी कुल्हाड हिचे वडील गुलाब नागोराव महारनर (४५, रा. चिंचना ता. अंजनगाव सुर्जी, जि. अमरावती) यांनी आपल्या मुलीला पतीसह सासरच्या लोकांनी विहिरीत ढकलून जीवे मारल्याचा आरोप केला. दोषी असलेल्या सासरच्यांविरुद्ध गुन्हे दाखल करून कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी करत तक्रार नोंदविली आहे. पोलिसांनी ही तक्रार चौकशीवर ठेवली आहे.