नवऱ्याच्या त्रासाला कंटाळून पत्नीने आत्महत्या केली! आता नवऱ्याला न्यायालयाचा दणका; घटना अंबाशीची...

 
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): पती आणि पत्नी ही संसाराच्या रथाची दोन चाके. संसाराचा गाडा यशस्वीपणे पुढे न्यायचा असेल तर दोघांचीही भूमिका तेवढीच महत्वाची असते. पण चिखली तालुक्यातील अंबाशी येथील संदीप जाधव याला ते जमले नाही. लग्नात मिळालेल्या कमी हुंड्यावरून व माहेरवरून पैसे आणण्यासाठी तो पत्नीला वारंवार शारीरिक व मानसिक त्रास द्यायचा. सततच्या त्रासाला कंटाळून पत्नीने आत्महत्या केली. प्रकरण आधी पोलीस आणि नंतर न्यायालयात गेले. आता न्यायालयाने आरोपी संदीप जाधव याला चांगलाच दणका दिला आहे. आरोपीला आता त्याच्या कर्माची फळे भोगावी लागणार आहेत.
 

  प्रकरणातील मृतक उज्वला जाधव यांचा विवाह अंबाशी येथील संदीप जाधव याच्याशी झाला होता. दरम्यान, लग्नानंतर संदीप याने मृतक उज्वलाच्या वडिलांना हुंड्याची मागणी केली होती. आरोपी संदीप याने हॉटेल व्यवसायाकरीता सासरच्या मंडळीकडून ३० हजार रुपये घेतले होते. ही रक्कम उज्वला हिच्या आईवडिलांनी बचत गटाकडून व्याजाने घेतली होती.

मात्र, पैसे परत न देता आरोपी संदीपने हे पैसे हुंड्यात मोडले गेल्याचे सांगितले. पैसे परत न देण्याच्या कारणावरून सतत मृतक उज्वला हिला शारीरिक व मानसिक त्रास द्यायचा. दरम्यान पतीचा त्रासला कंटाळून उज्वला हिने १९ जून २०१९ रोजी अंबाशी येथे राहत्या घरी आत्महत्या केली. घटनेची तक्रार मृतक उज्वला हिच्या वडिलांनी चिखली पोलीस ठाण्यात दिली. 

तक्रारीवरुन आरोपी संदीप जाधव, शाम जाधव, लता जाधव, कविता इंगळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर बुलढाणा येथील न्यायालयात दोषारोप पत्र दाखल झाले. प्रकरणात सरकारपक्षातर्फे १० साक्षीदार तपासण्यात आले. 
यामध्ये मृतक उज्वलाच्या वडिल व काकू यांची साक्ष महत्वपूर्ण ठरली. यानंतर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश स्वप्नील खटी यांनी आरोपीस तीन वर्षाचा सश्रम कारावास व ५ हजार दंड अशी शिक्षा सुनावली. प्रकरणाध्ये विशेष सरकारी वकील ॲड. एस.पी. हिवाळे यांनी प्रभावी बाजू मांडली. कोर्टपैरवी म्हणून पोलीस हेड कॉन्स्टेबल नंदाराम इंगळे यांनी सहकार्य केले.