"ते' दोन चोर खामगाव शहर पोलिसांना का ठरताहेत भारी!

आता महिला टार्गेट!!; ॲक्टिवावरून आले अन्‌ मोबाइल घेऊन काढला पळ
 
खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः गेल्या काही दिवसांपासून गुंडगिरीवर उतरलेल्या दोन मोबाइल चोरांनी खामगाव शहर पोलिसांना हैराण केले असून, तरुण, अल्पवयीन मुलांना टार्गेट केल्यानंतर आता या चोरट्यांनी आपला मोर्चा एकट्या दुकट्या महिलांकडे वळवला आहे. खामगाव शहरातील तायडे कॉलनीत ॲक्‍टिवावरून दोन चोर आले आणि त्‍यांनी महिलेचा मोबाइल घेऊन पळ काढला. ही घटना २७ डिसेंबरला दुपारी १ च्या सुमारास घडली.

सौ. दुर्गा दुर्गेश अकोटकार (२९, रा. तायडे काॅलनी खामगाव) यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. त्‍या खासगी नोकरी करतात. दुपारी १ वाजता अंजुमन शाळेमागील गल्लीतून घरी जाताना ॲक्‍टिवावर दोन चोरटे आले. त्‍यांनी ताई आमच्या ताईचा अपघात झाला आहे. सध्या ते कोणत्या हाॅस्पिटलला आहेत हे आम्हाला माहिती नाही. तुमच्या मोबाइलवरून फोन करू द्या, असे म्‍हणत त्‍यांनी मोबाइल मागितला.

माणुसकीच्या भावनेने दुर्गा यांनी त्‍यांना मोबाइल दिला. एकाने मोबाइल घेतला. नंबर लावून कोणाला तरी फोन केला. मात्र फोनमध्ये आवाज येत नसल्याचे सांगून तो बाजूला गेला. तेवढ्यात त्याचा सोबती ॲक्‍टिवा घेऊन त्याच्याकडे गेला आणि दोघे मोबाइल घेऊन गायब झाले. महिलेने आरडाओरड केली, पाठलाग केला. पण दोघे पळून जाण्यात यशस्वी झाले. महिलेच्या तक्रारीवरून खामगाव शहर पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.