व्हॉट्स ॲप ग्रुपवर अश्लील मेसेज टाकणे भोवले; शेगावचा गटशिक्षणाधिकारी निलंबित!
कार्यालयीन मेसेज पाठविण्यात येणाऱ्या पंचायत समिती शिक्षण विभागाच्या व्हॉट्स ॲप ग्रुपवर केवट यांनी १ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजून ५० मिनिटांनी एका महिला शिक्षिकेचा उल्लेख करत अश्लील मेसेज टाकला होता. या ग्रुपमध्ये संबंधित महिला शिक्षिकेसह अन्य महिला शिक्षिका, शिक्षकही आहेत. महिला शिक्षिकांची या मेसेजमुळे कुचंबना झाली.
प्रभारी गटशिक्षणाधिकाऱ्याने हा प्रकार केल्याने मुख्याध्यापक, शिक्षकांनी नाराजी व्यक्त केली होती. काहींनी केवट यांना मेसेजबद्दल माहिती दिल्यानंतर त्यांनी तो डिलिट केला. मात्र डिलिट करताना डिलिट फॉर एव्हरीवन करण्यासाठी गडबडीत केवळ डिलिट फॉर मी हे ऑप्शन निवडले गेले आणि मेसेज तसाच राहिला. या घटनेनंतर काही शिक्षकांनी शिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रार केली असता मेसेजमध्ये ज्या शिक्षिकेचा उल्लेख आहे, त्यांनी तक्रार केल्यास कारवाई होऊ शकेल, असे सांगण्यात आले होते. त्यानंतर आता तीन महिन्यांनी निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.