क्या बात ! पिंपळगाव सराईत हिंदू मुस्लिम एकतेचे अनोखे दर्शन; फकीर शहांनी लग्नाची पत्रिका खासच छापली... 

 
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा: गणेश धुंदाळे):चिखली तालुक्यातील पिंपळगाव सराई.. सैलाणी बाबांच्या कृपाशीर्वादाने पावन झालेली ही भूमी. त्यामुळे पिंपळगाव सराई या गावाला देशात महत्त्वाचं धार्मिक महत्व लाभलेलं आहे.. सुरुवातीपासूनच ह्या पंचक्रोशीत हिंदू मुस्लिम एकता पहावयास मिळाली आहे. त्यात आणखी एक उत्तम उदाहरण समोर आले आहे. पिंपळगाव सराईतील सामाजिक कार्यकर्ते फकिरा शाह यांच्या मुलीचा विवाह येत्या रविवारी,७ जानेवारीला होऊ घातला आहे. हिंदू मुस्लिम एकतेच्या पवित्र भावनेने त्यांनी लेकीची पत्रिका चक्क हिंदू परंपरेनुसार छापली. पत्रिकेच्या मजकुरात संत गजानन महाराज, संत सैलानी बाबा यांच्या प्रतिमा आहेत. त्यांच्या या अनोख्या संकल्पनेचे सर्वत्र स्वागत केले जात आहे.
फकीरा शाह यांची लेक अर्शिया नाज हिचा निकाह कयूमशाह जुनेद यांच्याशी होत आहे. पिंपळगाव सराईतील स्वामी समर्थ मंदिराजवळ हा विवाह सोहळा ७ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे. तत्पूर्वी नातेवाईकांना, स्नेहीजणांना निमंत्रण पत्रिका वाटप सुरू आहे.. हिंदू परंपरेनुसार छापण्यात आलेली निमंत्रण पत्रिका सर्वत्र लक्ष वेधत आहे. दरम्यान फकिरा शाह यांनी बुलडाणा लाइव्हला माहिती देताना सांगितले की, समाजामध्ये दिवसेंदिवस वाढत चाललेली द्वेष भावना नष्ट व्हावी, व सगळीकडे सामाजिक संदेश पोहोचावा या अनुषंगाने लग्नाची निमंत्रण पत्रिका हिंदू परंपरेनुसार छापली.