दीड कोटीची पाणीपट्टी थकल्याने २५ गावांचा पाणीपुरवठा खंडीत!; संग्रामपूर, जळगाव जामोद तालुक्यात खळबळ
Jan 29, 2022, 10:22 IST
संग्रामपूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः १ कोटी ६७ लाख रुपयांची पाणीपट्टी थकल्याने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने संग्रामपूर तालुक्यातील १७ आणि जळगाव जामोद तालुक्यातील ९ अशा एकूण २६ गावांचा पाणीपुरवठा खंडित केला आहे. त्यामुळे दोन्ही तालुक्यांत खळबळ उडाली असून, या गावांतील ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. वारी हनुमान धरणातून १४० गाव पाणीपुरवठा योजनेद्वारे या गावांना पाणीपुरवठा केला जातो. ग्रामपंचायतींनी पाणीपट्टीच न भरल्याने थकीत रकमेचा डोंगर वाढत गेला आहे.
या गावांच्या तोंडचे पळाले पाणी...
जळगाव जामोद तालुका ः खेर्डा बुद्रूक, खेर्डा खुर्द, सुनगाव, सातळी, सुकळी, उसरा बुद्रूक, उसरा खुर्द, मालठाणा, बोराळा.
संग्रामपूर ः काटेल, मोमिनाबाद, मनार्डी, उकळगाव, जस्तगाव, आकोली बुद्रूक, धामणगाव गोतमारे, आकोली खुर्द, राजपूत, सावळी, सायखेड पिंगळी, आलेवाडी, पळशी झाशी, उमरा पंचाळा आदी.
आणखी काही गावांचा पाणीपुरवठा खंडित होणार
पाणीपट्टी न भरणारी आणखी काही गावे लिस्टमध्ये असून, त्यांनी वेळेत पाणीपट्टी न भरल्यास त्याही गावांचा पाणीपुरवठा खंडित करू, असा इशारा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने दिला आहे.