वाघ नव्हे तडस!; वनविभागाचे स्पष्टीकरण, आता वाघोबा वाघोबा करू नका...!!
खामगावच्या गाडगे बाबानगरात ४ डिसेंबरला वाघ सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला होता. नंतर अधूनमधून चार-पाच दिवस तो दिसल्याचे दावेही झाले. पण नंतरच्या काळात तो काही दिसला नाही. कोणत्या कॅमेऱ्यातही कैद झाला नाही. त्यानंतर काल, २१ डिसेंबर रोजी एमआयडीसी परिसरात मजुरी करणाऱ्या आशा भिसे या महिलेने वाघ पाहिल्याचा दावा केला होता.
परिसरात एका बकरीची शिकार वन्यप्राण्याने केल्याचे दिसून आल्याने तिच्या दाव्याला पुष्टीही मिळाली. पण तो वाघच होता का, याचे खात्रीशीर पुरावे मिळाले नव्हते. त्यानंतर आज, २२ डिसेंबरला जनुना शिवारात आणखी एका बकरीची शिकार झाल्याचे समोर आले. मात्र शिकार झाल्याच्या आसपास जे वन्यप्राण्याचे ठसे आढळले, ते वाघाचे नसून तडसाचे असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी किशोर पडोळ यांनी बुलडाणा लाइव्हकडे स्पष्ट केले.
त्यामुळे बकरीची शिकार तडसानेच केली, असे सांगण्यात आले. त्यामुळे काल बकरीची शिकारही तडसानेच केली असावी आणि महिलेने वाघ नव्हे तर तडस पाहिले असावे, अशी शक्यता व्यक्त होत आहे. चार डिसेंबरनंतर वनविभागाच्या बुलडाणा आणि अमरावती येथील विशेष पथकाने तब्बल ६ दिवस वाघाचा रात्रंदिवस शोध घेतला होता. मात्र त्यांच्या हाती वाघोबा लागला नव्हता.