शेगावात शेकडो शेतकऱ्यांचे हजारो रुपये अडकले! नाफेड अंतर्गत शासनाने ज्वारी खरेदी केली, पण नाफेड केंद्रात घोळ झाला..

 
शेगाव (संतोष देठे पाटील : बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) २०२४ च्या रब्बी हंगामातील ज्वारी शासनाने खरेदी करायला सुरुवात केली आहे. शासनाचा हमीभाव ३१८० इतके रुपये आहे. शेगाव तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांनी नाफेड केंद्रात ज्वारी विक्री केली. अनेकांनी ज्वारी मोजून दिली असून, शासनाने ती खरेदी देखील केली आहे. परंतु नाफेड केंद्रावरील तांत्रिक बिघाडामुळे शेतकऱ्यांच्या ज्वारीच्या पट्टया ऑनलाइन झालेल्या नाहीत. त्यामुळे शेकडो शेतकऱ्यांचे पैसे शासनाकडे अडकले आहेत. दरम्यान, शासनाने यावर काळजीपूर्वक लक्ष दिले पाहिजे. आणि शेतकऱ्यांना त्यांचा मोबदला लवकरात लवकर मिळवून दिला पाहिजे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. यासंदर्भात आज १२ जुलै रोजी शेगाव तहसीलदार यांना निवेदन सुपूर्द करण्यात आले. 
काबाडकष्ट करत कसेबसे पैसे जमवून रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी ज्वारीचे उत्पादन काढले. यांनतर शासनाने ज्वारी खरेदी करण्यास सुरुवात केली. शेगाव तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांनी नाफेड केंद्रावर जावून नोंदणी केली. त्यातील काहीच शेतकऱ्यांचा माल शासनाने खरेदी केला. मात्र, नाफेड केंद्रावर तांत्रिक बिघाड झाल्याने शेकडो शेतकऱ्यांच्या ऑनलाइन पट्टया रखडल्या आहेत. शेतकऱ्यांनी शासनाला ज्वारी मोजून दिलेली आहे. तरी देखील शासनातर्फे मोबदला मिळाला नाही. यामुळे शेकडो शेतकऱ्यांची हजारो पैसे अडकले आहेत. ऐन पावसाळ्यात शेतकऱ्यांपुढे आसमानी संकट असताना, हे नवे संकट येऊन ठेपले आहे. शेकडो शेतकरी यामुळे त्रस्त असून शासनाने नाफेड केंद्रावर दुरुस्ती करून शेतकऱ्यांचे रखडलेले पैसे लवकरात लवकर दिले पाहिजे. अशी आर्त मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.