प्रतीक्षा संपली! अटाळीत JCB चा धडाका; भगतसिंगांच्या विचारांनी प्रेरित युवकाच्या लढ्याला अखेर यश!
अनेक वर्षांच्या संघर्षानंतर प्रशासनाची कारवाई; महसूल-पोलीस प्रशासनाच्या उपस्थितीत अतिक्रमण हटवण्यास सुरुवात
अटाळी गाव अतिक्रमणमुक्त व्हावे आणि गावाच्या विकासाला मोकळा मार्ग मिळावा, यासाठी येथील पुरुषोत्तम फुंडकर यांनी सातत्याने संघर्ष केला. क्रांतिवीर भगतसिंग यांच्या विचारांनी प्रेरित असलेल्या फुंडकर यांनी प्रशासनाच्या दारात अनेक वेळा आंदोलने केली. तसेच अन्नत्याग आंदोलनाचा मार्गही स्वीकारला. या आंदोलनादरम्यान त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले, मात्र तरीही त्यांनी आपला लढा थांबवला नाही.
अखेर त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याची प्रशासनाने दखल घेतली असून, आज महसूल आणि पोलीस प्रशासनाच्या उपस्थितीत अतिक्रमण हटविण्याची प्रत्यक्ष कारवाई सुरू झाली आहे.
अनेक वर्षांच्या संघर्षाला मिळाले मूर्त रूप!
अतिक्रमण हटविण्यासाठी JCB दाखल होताच अटाळी गावात नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न आता मार्गी लागत असल्याने स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
“फुंडकर यांनी जे केलं ते गावासाठी केलं. ही कारवाई काही वर्षांपूर्वीच झाली असती तर आजपर्यंत गावाचा चेहरामोहराच बदलला असता,” अशी प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी बुलडाणा लाइव्हशी बोलताना व्यक्त केली.
पुरुषोत्तम फुंडकर यांच्या सातत्यपूर्ण लढ्यामुळे अखेर प्रशासनाला कारवाई करावी लागल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे तीर्थक्षेत्र अटाळी आता विकासाच्या नव्या दिशेने वाटचाल करेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
अनेक वर्षांचा संघर्ष, आंदोलन आणि प्रतीक्षेनंतर अटाळीने आज मोकळा श्वास घेतला असून, फुंडकर यांच्या लढ्याचे अटाळीकरांकडून कौतुक होत आहे.