जिल्ह्यातील विध्वंस अभूतपूर्वच!केवळ सरकारामुळे पूरग्रस्तांचे पुनर्वसन अशक्य; रविकांत तुपकर म्हणाले संस्था, संघटनांचा पुढाकार काळाची गरज;
जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घेवून संस्थांना मदत कार्यात सहभागी करून घ्यावे
तुपकरांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या काही दिवसात झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसाने संग्रामपूर, जळगाव जामोद, शेगाव, मलकापूर, नांदुरा तालुक्यात महापुराची परिस्थिती निर्माण झाली आहे. मी गेल्या तीन दिवसांपासून जळगाव जामोद, संग्रामपूर तालुक्यातील ५० पेक्षा जास्त गावांमध्ये भेटी देऊन नागरिकांच्या व्यथा जाणून घेतल्या. अचानक एका तासात अनेकांचे संसार उध्वस्त झाले. घरेच्या घरे वाहून गेली आहेत. जमिनी खरडून गेल्या आहेत. मोठ्या प्रमाणात जनावरे वाहून गेली आहेत. नागरिकांच्या अश्रूंचा बांध फुटला आहे. दोन्ही तालुक्यात विदारक असे चित्र आहे. इथल्या लोकांचे दुःख बघवत नाही, त्यांना धीर तरी कोणत्या तोंडानी द्यायचा..? अशा निशब्द भावना आहेत. शासनाने मदत जाहीर केली पण ती अतिशय तोकडी आहे. त्यामुळे राज्य शासनाकडून तातडीने ह्या नुकसानग्रस्त नागरिकांना भरीव मदत मिळणे गरजेचे आहे.
राज्य शासनाच्या मदतीवर लगेच संपूर्ण परिवार उभे होतील असे चित्र दिसत नाही. त्यामुळे आपण आपल्या स्तरावरून तातडीने सर्व सेवाभावी संस्था, बुलढाणा जिल्ह्यातील पतसंस्था व शासनाचे अनुदान घेणाऱ्या इतर संस्थांची तातडीने बैठक घेऊन त्यांना गावनिहाय जबाबदारी वाटून देऊन बेघर झालेल्या नागरिकांना मदत करण्यासंदर्भात विनंती करावी. जेणेकरून रस्त्यावर आलेले संसार लवकरात लवकर उभे होण्यास मदत होईल.
तुपकरांचे जनतेला आवाहन
पुरामुळे महाभयंकर स्थिती उत्पन्न झाली आहे. लोकांची घरे, घरांमधलं संपूर्ण सामान, शेती, मुलांचं शालेय साहित्य सर्व काही वाहून गेलं आहे. नेसत्या वस्रानिशी हजारो ग्रामस्थ मदतीची वाट बघत आहेत. आता रोगराईही पसरायला सुरुवात झाली आहे. आजार वाढले आहे. डोळ्यांची साथ पसरत आहे. यासरकारकडून येणाऱ्या मदतीवर अवलंबून राहिलो तर इथे परिस्थिती आणखीच बिकट होईल. यामुळे सेवाभावी संस्थांनी, दानशूर नागरिकांनी पुढे येऊन उद्ध्वस्त झालेल्या गावांना पुन्हा उभं करण्यासाठी, नागरिकांना जगवण्यासाठी मानवतेच्या दृष्टीकोनातून मदतीचा हात द्यावा, सर्व वयोगटातील व्यक्तींसाठी नवीन कपडे, औषधे, गृहोपयोगी साहित्य, किराणा माल, शैक्षणिक साहित्य, जनावरांसाठी चाऱ्याची प्रामुख्याने गरज आहे ,असे निदर्शनास आले. ज्यांना वरील पैकी कोणत्याही स्वरूपाची मदत द्यायची असेल, त्यांनी स्वाभिमानी हेल्पलाईन सेंटर, बुलढाणा येथे जमा करावी अशी कळकळीची विनंती तुपकर यांनी केली आहे.