रविकांत तुपकरांच्या भूमिकेकडे राज्याचे लक्ष! आज पुण्यात राज्यभरातील समर्थक कार्यकर्त्यांची बैठक; नवे संघटन की आणखी काही वेगळा निर्णय?

 
बुलडाणा(अक्षय थिगळे:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून निष्काशीत केल्यानंतर रविकांत तुक्कर आज,२४ जुलै रोजी प्रथमच कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत. पुण्यात रविकांत तुपकर यांनी राज्यभरातील पदाधिकारी व प्रमुख समर्थक कार्यकर्त्यांची बैठक बोलावली आहे. पुण्यातल्या गांजवे चौकातील एस. एम जोशी हॉलमध्ये ही बैठक होणार असून काल रात्रीपासूनच पदाधिकारी कार्यकर्ते पुण्यात दाखल झाले आहेत. रविकांत तुक्कर आज काय भूमिका जाहीर करतात, कुठला राजकीय निर्णय घेतात? वेगळे संघटन निर्माण करतात की आणखी काही याची उत्तरे आज दुपारी बैठकीनंतर मिळणार आहेत. त्यामुळे या बैठकीकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून आहे. 
बुलडाणा लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून रविकांत तुपकर यांनी जवळपास अडीच लाख मते घेतली. सांगलीच्या विशाल पाटलांचा अपवाद वगळता अपक्ष म्हणून अडीच लाख मते घेणारे रविकांत तुपकर हे एकमेव उमेदवार ठरले. दरम्यान लोकसभा निवडणुकीत पराभव झाला असला तरी तुपकर यांचे नेतृत्व या निवडणुकीत उठून दिसले.
काही दिवसांनी बुलडाणा शहरात झालेल्या बैठकीत त्यांनी बुलडाणा लोकसभा मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवण्याचे जाहीर केले होते. शिवाय राज्यस्तरीय राजकीय भूमिका २४ जुलैला जाहीर करणार असल्याचेही ते म्हटले होते. दरम्यान परवा,२२ जुलैला स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शिस्तपालन समितीने रविकांत तुपकर यांना शेतकरी संघटनेतून निष्काशित केले, त्यामुळे तुपकर आता काय भूमिका घेतात यासह बुलडाणा जिल्ह्यासह राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून आहे.