प्रेमानं कसं जिंकता येत ते एसपी सुनील कडासनेंनी दाखवून दिलं! ज्या गावात झाला होता "एलसीबी" पथकावर हल्ला त्याच फत्तेपुरात एसपींनी काय केलं वाचा....

 
खामगाव(भागवत राऊत: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): ३१ मे च्या पहाटे चार ते साडेचारच्या सुमारास खामगाव तालुक्यातील फत्तेपुर येथे आरोपी पकडण्यासाठी गेलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकावर हल्ला झाला होता. याप्रकरणी १ जून रोजी हिवरखेड पोलीस ठाण्यात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस नाईक युवराज राठोड यांच्या तक्रारीवरून २० ते २५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. खामगाव तालुक्यातील बोरी आडगाव शिवारातील एका घरावर पडलेल्या दरोड्यातील संशयित आरोपी फत्तेपूर येथील एका विशिष्ट समाजाच्या वाड्यावर असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती, त्या माहीतीच्या आधारे शोधमोहीम करण्यासाठी एलसीबीचे पथक त्या वाड्यावर गेले असता त्यांच्यावर स्थानिकांनी हल्ला केला होता. यामुळे पोलीस पथकाला आल्यापावली जीव वाचवत माघारी फिरण्याची नामुष्की ओढवली होती. दरम्यान काही दिवसाआधी स्थानिक गुन्हे शाखेच्या एका कर्मचाऱ्याचा एक व्हिडिओ देखील काही ठिकाणी झळकला होता. त्यातून त्या हल्ल्याची दाहकता समोर आली होती, विशेष म्हणजे बाहेर आलेल्या व्हिडिओच्या तुलनेत पोलिसांच्या वतीने देण्यात आलेली तक्रार सौम्य होती..दरम्यान त्याच फत्तेपुर येथील वाड्यावर आज जिल्हा पोलिस अधीक्षक सुनील कडासने यांनी भेट दिली..सातत्याने गुन्हेगार म्हणून पाहल्या जाणाऱ्या समाजाला एसपींनी मात्र प्रेमाने जिंकल्याचे यावेळी दिसले. अशिक्षित राहू नका, लेकराबाळांना शिकवा..खूप शिका ,संघटित व्हा असे एसपी यावेळी म्हणाले. "त्या" वस्तीवर सीसीटिव्ही कॅमेरे देखील लावण्यात आले.
फत्तेपूर आणि खामगाव तालुक्यातील अटाळी येथील पारधी समाज बांधवांच्या वस्तीवर आज एसपी सुनील कडासने यांनी भेट दिली. अप्पर पोलीस अधीक्षक बी.बी.महामुनी, उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद ठाकरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अशोक लांडे , खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुरेश नाईकनवरे, नायब तहसीलदार हेमंत पाटील यावेळी उपस्थित होते. ज्यांनी शिक्षण घेतलं त्यांनी आपल्या पोरींना शिकवा, आई शिकेल तर मुले घडतील आईमुळेच छत्रपती शिवराय घडले. ज्या घरातील स्री शिकलेली असते ते घर समाजामध्ये प्रगती करीत असते. खूप शिका, संघटित व्हा व उत्तम माणूस बना. मी स्वतः कधीही आपल्या सेवेत तत्पर आहे. कधीही काम पडलं, अडचण आली तर प्रत्यक्ष मला येथून भेटा असे एसपी सुनील कडासने यावेळी म्हणाले.