धक्कादायक! वयाच्या १९ व्या वर्षी हृदय बंद पडले; सैन्यभरतीची तयारी करत होता, सकाळी रनिंग करून आला अन् जीव गेला! देशसेवेचे स्वप्न अधुरेच राहिले! संग्रामपूर तालुक्यावर शोककळा..

 
संग्रामपूर(ज्ञानेश्वर ताकोते:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): कधी कुणाचा जीव जाईल याचा नेम नाही..आलेल्या प्रत्येकाला एकदा हे जीवन सोडून जावेच लागते हे जरी अंतिम आणि शाश्वत सत्य असले तरी कुटुंबातील व्यक्तीचे अकाली जाणे मनाला चटका लावणारे असते.. आयुष्याच्या एका महत्वाच्या टप्प्याची सुरुवात करीत असतांनाच कुणाचा जीव गेला तर...याची कल्पनाच करवत नाही..मात्र संग्रामपूर तालुक्यातील टुनकी गावातील विष्णू लोणकर यांच्या कुटुंबावर आता दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे, त्यांच्या १९ वर्षाच्या तरुण मुलाचे हृदय बंद पडल्याने निधन झाले. गणेश चतुर्थीच्या सकाळी ही घटना घडली.
 

गणेश विष्णू लोणकर असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. गणेश सैन्यभरतीची तयारी करीत होता. दररोज सकाळी लवकर उठून तो टूनकी बावणबिर रस्त्यावर धावायचा  व नंतर व्यायाम करायचा. काल, पहाटे लवकर उठून त्यांनी रनिंग चा सराव केला. नंतर व्यायाम केल्यावर घरी जाऊन चहापाणी घेऊन झाल्यावर तो घरातच कोसळला. त्याला तपासणीकरीता रुग्णालयात नेण्यात आले मात्र हृदयविकाराचा झटका आल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. 


गणेशच्या मोठ्या भावाचे ३ वर्षापूर्वी विजेच्या धक्क्याने निधन झाले असल्याने गणेश आईवडिलांना एकुलता एक होता. सैन्यात भरती होऊन देशसेवा करण्याचे त्याचे स्वप्न होते. शेती आणि ड्रायव्हर म्हणून काम करणाऱ्या वडिलांच्या कष्टाचे पांग फेडण्यासाठी तो सातत्याने मेहनत घेत होता. मात्र गणेशच्या अकाली जाण्याने सगळीकडे शोककळा पसरली आहे.