संदीप शेळकेंची संवेदनशीलता! आई-वडिलांचे छत्र हरवलेल्या तिघांचे स्वीकारले पालकत्व!
म्हणाले, त्यांच्यासाठी सगळ काही करणार...
Dec 14, 2023, 12:35 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मोताळा तालुक्यातील रिधोरा गावातील तीन चिमुकले गत महिन्यात पोरकी झाली. मागील महिन्यात वडील संदीप मानकर यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला. वर्षापूर्वी दीर्घ आजारामुळे आई सुद्धा मरण पावली, आई वडिलांचे छत्र हरववल्याने चिमुकली पोरकी झाली आहे. वर्तमान इतका दयनीय स्थितीत आहे, भविष्यासाठी कसा विचार करतील ती लेकर..? असा प्रश्न सर्वत्र पडत असतानाच राजश्री शाहू तथा वन मिशन बुलढाणा चे प्रमुख संदीप शेळके यांनी चिमुकल्यांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारले.
२९ नोव्हेंबर २०२३ (वडील) संदीप मानकर हृदयविकाराने मृत पावले, ते मोताळा तालुक्यातील रीधोरा गावात मजुरी करून लेकरांचा संभाळ करीत होते. शिवाय भूमिहीन असल्यामुळे आर्थिक संकटांशी दोन हात करावे लागतच, मागील वर्षी दीर्घ आजारामुळे पत्नीचे निधन झाल्यानंतर लेकरांना धीर देऊन सांभाळण्याचे आव्हान तितकेच मोठे.. नंतरच्या काही महिन्यांत चिमुकल्यांच्या आजीचाही मृत्यू झाला. शेवटी माऊलीच्या मायेविना जगणे कठीण, तरीसुद्धा ते खचले नाही. तिन्ही लेकरांचे शिक्षणासाठी दिवसरात्र मजुरी करत राहिले,त्यांच्या दोन मुली मोताळ्यातील बबनराव देशपांडे विद्यालय नववी आणि सहावीकरता शिक्षण घेत आहेत, तर मुलगा जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकतो आहे. लेकरांसाठी काबाड कष्ट करत असतानाच काळाने मात्र, संदीप मानकर (चिमुकल्यांचे वडील) यांच्या जीवनावर झडप घातली, हृदयविकाराच्या आजारामुळे त्यांची प्राणज्योत माळवली. संपूर्ण रिधोरा गाव शोक सागरात आहे, सांत्वन करण्यासाठी लेकराच्या भेटीला जेव्हा गावातील लोक येतात.. निराधार लेकरांचे चेहरे पाहून प्रत्येकाच्या हृदयाला पाझर फुटल्याशिवाय राहत नाही.. अशी कथा चिमुकल्या मानकर भावंडाची आहे.
संदीप शेळकेंची संवेदनशीलता...
याविषयी राजश्री शाहू तथा वन मिशन बुलडाणा चे संदीप शेळके यांना माहिती मिळाली. शोक संवेदना व्यक्त करण्यासाठी तेही रिधोरा गावात पोहोचले. चिमुकल्यांच्या अंधकारमय भविष्याला उज्वल करण्याचा निर्णय संदीप शेळके यांनी घेतला. "अशी दुर्दैवी वेळ कुणावरही येऊ नये. यात बिचाऱ्या चिमुकल्यांचा काय दोष..त्यांना आता आधाराची गरज आहे, आणि ती जबाबदारी आपण उचलणार आहोत" असे संदीप शेळके यांनी जाहीर केले. चिमुकल्या मुलांना चांगल्या दर्जाचे शिक्षण, इथपासून तर मुलींचे लग्न, कन्यादान सगळ काही संदीप शेळके करणार आहेत..